Nagpur University: नागपूर विद्यापीठात 'पदवी लॅमिनेशन' घोटाळा? तीन वर्षांपासून पदवीचे लॅमिनेशन बंद असताना काढली देयके
esakal August 21, 2025 10:45 PM

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पदवी ‘सिक्युरिटी फिचर’सह देण्यात येते असल्याने लॅमिनेशनची प्रक्रिया तीन वर्षांपूर्वी बंद करण्यात आली आहे. मात्र, तरीही लॅमिनेशनच्या नावे विद्यार्थ्यांकडून वसुली करून त्यासाठी देयके काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विद्यापीठात दरवर्षी किमान ६० ते ७० हजार पदवी प्रमाणपत्र तयार केले जातात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एका वर्षाने संबंधित विद्यार्थ्यांची पदवी महाविद्यालयात पाठविण्यात येते. २०२१ च्या आधी पदवी लॅमिनेट करून देण्यात येत होती.

त्यासाठी १६ रुपये प्रत्येकी घेण्यात यायचे. मात्र, विद्यापीठाच्या बनावट पदवी तयार करून त्याआधारे नोकरी मिळविण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पदवी प्रमाणपत्राची गुणवत्ता आणि सुरक्षिततेसाठी त्यात ‘सिक्युरिटी फिचर्स’ टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. पदवीवर लॅमिनेशन केल्यास त्यातील ‘सिक्युरिटी फिचर्स’चा फायदा होणार नाही असा तर्क देत लॅमिनेशन बंद करावे, असा प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव मान्य झाल्याने लॅमिनेशन बंद करण्यात आले.

मात्र, लॅमिनेशन बंद झाले तरीही विद्यार्थ्यांकडून १६ रुपये प्रमाणे पैसे घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, व्यवस्थापन परिषदेच्या एका बैठकीत विष्णू चांगदे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना या शुल्काबाबत फेरविचार करण्याची मागणी केली. यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर खरेदी समितीकडून नवीन दर मागविण्याची शिफारस करण्यात आली. मात्र, खरेदी समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने हा विषय जसाचा तसाच राहीला. मात्र, परीक्षा विभागाकडून २०२२, २०२३ आणि २०२४ या वर्षात विद्यार्थ्यांकडून १६ रुपयाप्रमाणे पदवी आणि लॅमिनेशनच्या खर्चापोटी लाखो रुपयांचे शुल्क घेण्यात आले आहे. त्यामुळे हा पैसा नेमका कुणाच्या खिशात गेला? असा प्रश्न आहे.

मार्चच्या अधिसभेमध्ये ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी पदवीचे लॅमिनेशनवर नेमका किती खर्च होतो याबाबत विचारणा केली होती. त्यावर प्रशासनाने तो बंद केल्याचे सांगितले. ॲड. वाजपेयी यांनी तो खर्च का वसूल केल्या जातो अशी विचारणा केली होती. मात्र, प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तर देत, वेळ मारून नेण्यात आलेली होती.

मंजुरीसाठी देयके सादर

परीक्षा विभागातून याही वर्षी पदवी आणि त्याच्या लॅमिनेशनपोटी वसूल करण्यात आलेल्या पैशाबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यासाठी जवळपास ९ लाख १६ हजार रुपये मंजूर करण्यासाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्याचा दबाव वित्त व लेखा अधिकाऱ्यावर असल्याची माहिती आहे.

Crime News: प्रियकराच्या खूनप्रकरणी प्रेयसीसह दोघे जेरबंद; संभाजीनगरातील घटना, प्रेत सापडले मुंगीत, साखरखेर्डात होते आरोपी

ही बाब खरी आहे, की विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १६ रुपये लॅमिनेशनसाठी घेण्यात येतात. आता नव्या दरासाठी मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षीचे बील अद्याप मंजूर करण्यात आलेले नाही.

- हरीश पालीवाल, वित्त व लेखा अधिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.