शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संशोधन व्हावे
कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक काशीद यांचे प्रतिपादन
वाणगाव, ता. २० (बातमीदार) ः कृषी संशोधन केंद्र हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संशोधन आणि कृषी विस्ताराचे कार्य करीत आहे. पालघर जिल्ह्यात कृषी शिक्षणासाठी एकही पदवी महाविद्यालय नसल्याने जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य महाविद्यालय लवकरच शासनामार्फत चालू करण्यात येणार आहे, असे कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य विनायक काशीद यांनी म्हटले आहे. ते कृषी संशोधन केंद्रात आयोजित शुक्रवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
विद्यापीठाच्या भात बीजोत्पादनाबाबत समाधान व्यक्त करीत अजून सक्षम करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संशोधन व्हावे व बदलत्या हवामानानुसार शेतकरी सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून संशोधनाचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. या वेळी प्रगतिशील शेतकरी मिलिंद प्रभू, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अमोल दहिफळे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे, डॉ. एल. के. गभाले, डॉ. शौकत पिंजारी, माळी प्रशिक्षणाचे विद्यार्थी आणि कृषी संशोधन केंद्रातील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
माळी अभ्यासक्रमातून परदेशात संधी
केंद्रात कृषी संशोधन, विस्तार शिक्षण व इतर महत्त्वाच्या बाबींचा विनायक काशीद यांनी सखोल आढावा घेतला. दरम्यान, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अमोल दहिफळे यांनी संशोधन केंद्राच्या सर्व चालू बाबींबद्दल सखोल सादरीकरण केले. माळी अभ्यासक्रमातून युवा विद्यार्थ्यांना भारतातच नव्हे तर परदेशात रोजगाराची संधी याबाबत काशीद यांनी मार्गदर्शन केले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार
कृषी संशोधन केंद्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संशोधन केंद्राचे कृषी सहाय्यक महेश मुंणगेकर, गोवणे येथील कृषी सहाय्यक विकास पाटील, वनईचे कृषी सहाय्यक घनश्याम तोटकर, संशोधन केंद्राचे शिपाई दिलीप गुणगुणे आणि मजूर सुनीता सुतार या कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी उल्लेखनीय कार्याबद्दल विनायकराव काशीद यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.