भातशेती हिरवीगार
बोर्डी, ता. २१ (बातमीदार) ः ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ जणू काही कवीच्या मनातील पाऊस बरसत आहे. मागच्या दीड महिन्यांत पावसाने सर्वच भागात जोरदार हजेरी लावली आहे. एकंदर वातावरण अनुकूल व पोषक असल्यामुळे भातशेतीच्या पेरणीपासून ते लावणीपर्यंत अतिशय समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
मागील दोन दिवसांचा जोरदार पाऊस सोडला तर दररोज हलक्या सरी बरसत असल्यामुळे जमिनीमध्ये भातशेतीसाठी उपयुक्त ओलावा टिकून राहत आहे. यामुळे शेतीदेखील हिरवीगार बहरली आहे. एकूणच चालू हंगामात शेतकऱ्याला भातशेतीमध्ये आशादायक चित्र पाहावयास मिळत आहे. या भागात हळवी आणि निमगर विभाग शेती लावण्याची कामे जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तर गरवी भातशेतीच्या लावणीला लवकरच सुरुवात होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.