पिंपरी, ता. २२ : महापालिकेच्या कै. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासह उपनगरांतील काही रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये काही औषधांचा तुटवडा आहे. याबाबतच्या तक्रारी रुग्ण आणि नातेवाईक करत आहेत. तर, ‘‘गोळ्या बाहेरून विकत घ्या’’ असे उत्तर रुग्णांना दिले जात आहे. या स्थितीने आर्थिक अडचण असणारे रुग्ण त्रस्त झाले आहेत.
मोफत आणि अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने अत्याधुनिक रुग्णालय, आरोग्य केंद्र तसेच ‘आपला दवाखाना’ सेवा सुरू केली आहे. काही ठिकाणी डॉक्टरांची कमतरता, रुग्णांना बेड न मिळणे ही समस्या आहेच. रुग्णालयात बरीच औषधे मोफत किंवा अत्यल्प दरात दिली जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मानदुखी, अपस्मार अर्थात ‘फीट्स’ आणि मधुमेह सारख्या आजारांवर रुग्णालयात उपलब्ध होणारा औषधांचा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयांबाहेर असलेल्या दुकानांतून ही औषधी घेण्याचा मार्ग दाखवला जात आहे, अशी तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
मधुमेहाचा त्रास असल्याने मी महापालिका रुग्णालयात जातो. डॉक्टर तपासून गोळ्या लिहून देतात. मात्र, या गोळ्या तेथे मिळत नसल्याने बाहेरून विकत घ्याव्या लागतात. मी रुग्णालयाचा खूप जुना रुग्ण आहे. मात्र, अनेकवेळा काही औषधे मिळतात, काही वेळा मिळत नाही.
- किशोर कदम, रुग्ण
मला अपस्माराचा त्रास आहे. मात्र, त्या संबंधित गोळ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. एका पॅकेटसाठी रुग्णांना एकूण ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. अनेकदा सध्या रुग्णालयांत या गोळ्या नाहीत. त्यामुळे रुग्णांना त्रास होत आहे.
- संदेश गायकवाड, रुग्ण
दर महिन्याला मधुमेहावर नवीन औषधी येतात. त्यामुळे तुटवडा असू शकत नाही. अपस्माराच्या औषधांची मागणी केली आहे. दुसरे म्हणजे आपल्याकडे जेनेरिक औषध देण्यात येतात.
- डॉ. अभय दादेवार, विभाग प्रमुख, वायसीएम रुग्णालय