Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार; पेठ, त्र्यंबकेश्वरला मिळणार स्वतंत्र बाजार समित्या
esakal August 25, 2025 05:45 AM

पंचवटी: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार असून, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या स्वतंत्र बाजार समिती केली जाणार आहेत. त्यासाठी शासनाने स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यासाठी चौकशी समिती गठित केली आहे. महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाने याबाबत आदेश निर्गमित केली आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. मुद्देनिहाय चौकशी करून पुराव्यापृष्ठर्थ्य कागदपत्र व अभिप्रायासह एका आठवड्यात वस्तुस्थतीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक बाजार समितीचे विभाजन करून पेठ व त्र्यंबकेश्वर येथे नवीन समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करून शासनाला अहवाल सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपवली आहे.

त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांमध्ये नवीन बाजार समिती स्थापन करावयाची झाल्यास त्या दोन तालुक्यांमध्ये एक बाजार समिती स्थापन करावी की तालुकानिहाय स्वतंत्रपणे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करावी, तालुक्यामध्ये बाजार समिती स्थापन करावयाची झाल्यास आवश्यक असणारी जमीन उपलब्ध आहे का, दोन्ही तालुक्यांमध्ये बाजार समिती स्थापन केल्यास शेतकऱ्यांना फायदा हाईल का, आर्थिक बाबीची तरतूद कशी करण्यात येणारी आहे, उपबाजार असतील तर तेथील मालाची आवक-जावक, आर्थिक उलाढाल माहिती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची मालमत्ता, कर्मचारी विभाजन, महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजनाबाबत सत्यता पडताळणी असे एकूण सात मुद्देनिहाय चौकशी करून अभिप्रायासह आठवडाभरात अहवाल सादर करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

शेतकऱ्याचा फायदा होणार

सध्या पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी नाशिकला यावे लागते. यातील जवळपास पेठ ते नाशिक ५५ ते ५८ किलोमीटर आहे. त्र्यंबकेश्वर ते नाशिक ३० ते ३५ किलोमीटर आहे. यामुळे शेतकऱ्यावर वेळ, पैसा व श्रम यांचा मोठा बोजा पडतो. नाशिक बाजार समितीचे विभाजन होऊन स्वतंत्र बाजार समिती स्थापन झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Gokul Dudh Kolhapur : गोकुळच्या बैठकीत सभासदांनी दोनचं प्रश्न विचारले, अन् संचालकांना बोलायला काही उरलचं नाही; नेमकं काय घडलं...

शासन नियुक्त समिती अशी

समितीच्या अध्यक्षस्थानी संदीप जाधव (उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका), सदस्यपदी दीपक पराये, (सहायक निबंधक, सहकारी संस्था, इगतपुरी) व वैभव मोरडे (सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिंडोरी).

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.