मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत? घडामोडींना वेग
Tv9 Marathi August 25, 2025 05:45 AM

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवणार आहोत. काही ठिकाणी मतभेद असतील तिथे मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, मात्र महायुती हाच आमच्यासाठी पहिला पर्याय असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच महायुतीच्या काही नेत्यांकडून देखील हीच भूमिका मांडण्यात आली आहे.

मात्र आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नाशिक महापालिकेची देखील निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्वबळाच्या चाचपणीची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीदरम्यान प्रत्येक जागेसाठी आपली तयारी असली पाहिजे, अशा सूचना दादा भुसे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पंचायत समितीचा गन असेल, महापालिकेचा वार्ड असेल प्रत्येक ठिकाणी उमेदवार तयार असला पाहिजे.  नाशिक महापालिका, नाशिक जिल्हा परिषदेवर 100 टक्के भगवा फडकवू असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे, दरम्यान दादा भुसे यांच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गट महापालिकेसाठी स्वबळाची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कसे लढवणार, युती होणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबतचं चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.