पिंपळे गुरव : ‘‘गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण असून तो कायदा-सुव्यवस्था राखत शांततेत साजरा करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,’’ असे मत पोलिस उपायुक्त परिमंडळ (एक) संदीप आटोळे यांनी व्यक्त केले. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात ‘डॉल्बी’, ‘डीजे’, ‘लेझर लाइट’ यासारखी यंत्रणा वापरून गोंगाट न करता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय परिमंडळ एकतर्फे गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, महावितरण, महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. त्यावेळी आटोळे हे बोलत होते. पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे, सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, महावितरण व महापालिकेचे विभागीय अधिकारी, अग्निशमन विभागाचे प्रतिनिधी, शांतता समिती सदस्य तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश मूर्ती शाडू मातीच्या वापरातूनच घडवाव्यात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती टाळाव्यात, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देखील गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे बैठकीत आवाहन करण्यात आले. पोलिस निरीक्षक अमोल नांदेकर यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले; तर तुषार साळुंखे यांनी नियोजन केले.
पोलिसांच्या प्रमुख सूचनाध्वनिक्षेपकांची मर्यादा पाळावी; ‘डॉल्बी’, ‘डीजे’ वर्ज्य
वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्या
मंडळात स्वयंसेवक नेमून सुरक्षाव्यवस्थेत सक्रिय मदत द्या
अग्निशमन उपकरणे ठेवणे बंधनकारक
देखावे १५ फूट उंचीपेक्षा जास्त नसावेत
आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारे देखावे उभारू नयेत
मंडप मजबूत, सुरक्षित व सीसीटीव्ही यंत्रणेसह असावा