ऊर्से, ता. २२ : येथील मुख्य विजेच्या वाहिनीवरील तारा गेल्या दोन-तीन महिन्यांत चार वेळा तुटून खाली पडल्या असून, अनेक ठिकाणी तारा लोंबकळत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ऊर्से गावातील समाज मंदिराजवळील विजेच्या खांबावरील तारा गेल्या सहा महिन्यांपासून लोंबकळत्या स्थितीत आहेत. याबाबत येथील पवन मावळ वारकरी संघटनेचे कार्याध्यक्ष मकरंद ढम यांनी ग्रामपंचायत व वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधत सांगुनही काही काम करण्यात आले नाही. त्यांनी ग्रामपंचायत व वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली होती, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
ग्रामस्थांच्या मते, गेली ५० वर्षे येथील विद्युत तारा बदलण्यात आलेल्या नाहीत. तार तुटल्यावर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी फक्त तुटलेली वायर जोडण्याचे काम करतात, मात्र नव्या वायर न बसवल्यामुळे वारंवार तारा तुटत आहेत. नुकताच एक प्रकार घडला, ज्यात तुटलेली विद्युत तार थेट एका घरावर पडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, दहा वर्षांपूर्वी अशाच प्रकारामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. असे असतानादेखील संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करूनही काही उपाययोजना केली जात नाही.
काही दिवसांपूर्वी वीज वितरणचे अधिकारी पाहणीसाठी आले होते. त्यांनी पावसाचे कारण देत सध्या काम करता येणार नाही. दसऱ्यानंतर नवीन तारा बसवण्यात येतील. कामाला मंजुरी मिळाली आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.