पिंपरी/तळेगाव दाभाडे : ‘‘कोरोनापूर्वी दुपारी लोकल सुरू होत्या; पण आता ट्रॅक दुरुस्तीचे कारण सांगत लोकल बंद ठेवण्यात येत आहेत. पण, त्याच वेळेत अन्य मालगाड्या व एक्सप्रेस धावतात. दुपारी मालगाड्या व एक्सप्रेस चालतात मग लोकल का नाही?’’ असा प्रश्न प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. या शिवाय रात्री ११.१५ वाजता शिवाजीनगरहून सुटणारी तळेगाव लोकलदेखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ‘‘रात्री कोणती ट्रॅकची दुरुस्ती होते?’’ असा उपरोधिक सवाल प्रवाशांनी केला आहे.
पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारच्या लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी मागील चार वर्षांपासून होत आहे. या लोकल पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सात्यत्याने पाठपुरावा करत आहेत. सात डिसेंबर २०२३ रोजी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना, तर २० मे २०२५ रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही या मागणीचे पत्र देण्यात आले.
Pune News : पुण्यात सर्वाधिक तृतीयपंथींची नोंदणी, राज्यात ठाणे दुसऱ्या क्रमांकावर; साडेचार हजार जणांना प्रमाणपत्रसभागृहातही मुद्दा उपस्थित करून दुपारच्या लोकल पूर्ववत करण्याची मागणी केली. याबाबत अखेर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ११ ऑगस्ट रोजी खासदार श्रीरंग बारणे यांना लेखी उत्तर दिले. यात ‘‘दुपारी बारा ते तीन या वेळेत ट्रॅकच्या देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू असतात. त्यामुळे लोकल सुरू करणे शक्य नाही,’’ असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा तळेगाव येथील निरंजन फलके, दिलीप डोळस, अमित प्रभावळकर, सुरेश चौधरी व विलास सोनवणे यांनी दिला आहे.
प्रवाशांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष
गर्दीच्या वेळेस लोकल फेऱ्या वाढवा
चिंचवड स्थानकावर प्रगती एक्स्प्रेसला थांबा द्या
सह्याद्री एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत सुरू करा
प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीनला बोगी वाढवा
सिंहगड एक्स्प्रेसला पासधारक महिलासांठी आरक्षित बोगी द्या, तळेगावला थांबा द्या
कोरोनानंतर दुपारी रेल्वे ट्रॅकची देखभाल दुरुस्ती करायला सुरुवात केली का? मग, पूर्वी देखभाल दुरुस्ती करत नव्हते का? रेल्वे प्रशासन लोकल सुरू करण्याबाबत फक्त चालढकल करत आहे.
- मयूरेश जव्हेरी, प्रवाशी