मोठी बातमी! पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर, वाचा सविस्तर
Tv9 Marathi August 23, 2025 09:45 AM

गेल्या काही काळापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर केलं आहे. अशातच आता पुणे महापालिकेने आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. यात एकूण 41 प्रभाग असून त्यात 165 नगरसेवक असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार आहेत. यातील 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे. यातून एकूण 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

41 प्रभाग असणार

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2011 च्या जनगणनेनुसार ही प्रभागरचना जाहीर झाली आहे. यानुसार पुणे शहराची लोकसंख्या 34 लाख 81 हजार 359 इतकी आहे. याच्या आधारे ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. 165 सदस्यांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 41 प्रभाग बनवण्यात आले आहेत. यातील प्रभाग क्रमांक 38 हा 5 सदस्यीय असून उर्वरित 40 प्रभाग 4 सदस्यीय असणार आहेत.

आंबेगाव- कात्रज हा सर्वात मोठा प्रभाग

समोर आलेल्या माहितीनुसार आंबेगाव- कात्रज हा लोकसंख्येनुसार सर्वात मोठा (1,14,970) आणि अप्पर सुपर इंदिरानगर हा सर्वात लहान (75,944) प्रभाग असणार आहे. जाहीर झालेल्या प्रभागरचनेनुसार कळस- धानोरी हा पहिल्या क्रमांकाचा प्रभाग असणार आहे, तसेच महंमदवाडी- उंड्री हा शेवटटा म्हणजेच 41 नंबरचा प्रभाग असणार असणार आहे.

3 सप्टेंबरपर्यंत हरकती सादर करता येणार

जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात ज्या नागरिकांना हरकती किंवा सूचना असतील त्यांनी 22 ऑगस्ट 2025 ते 3 सप्टेंबर 2025 या कालावधील कार्यालयीन वेळेत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात जमा करण्याचे आवाहन करण्यात यावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.