शिर्डी: नौदल अधिकारी होऊन आईचे स्वप्न साकार केले. माझ्या शिक्षणासाठी तिने दागिने गहाण टाकले. पहिला पगार झाला की, मी हे दागिने सोडवून आणेन त्यावेळी खरा आनंद होईल, अशा शब्दात नौदल अधिकारी चैतन्य कोते यांनी भावना व्यक्त केल्या.
नौदल अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल चैतन्य कोते यांचा विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आाल. प्रारंभी फुलांचा वर्षाव करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर, शिर्डी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, भाजपचे मंडल अध्यक्ष रवींद्र गोंदकर, मनसेचे माजी नगरसेवक दत्तात्रय कोते आणि सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब कोते आदी उपस्थित होते.
स्वागत झाल्यानंतर चैतन्य कोते यांनी आईला सॅल्यूट केला, आपल्या डोक्यावरची टोपी तिच्या डोक्यावर ठेवताच वातावरण भावुक झाले. त्यांच्या मातोश्री जयश्री कोते यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माजी नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले, चैतन्यने शिर्डीचे नाव उज्ज्वल केले. रमेश गोंदकर म्हणाले, चैतन्यच्या आईने केलेला संघर्ष आणि त्यागाचे फलित आहे. त्यांना शिर्डीकरांतर्फे मानाचा मुजरा करावा लागेल.