मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. हा मोर्चा पहिल्या मोर्च्यापेक्षा पाच पट मोठा असेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे, जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान यावर आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
असं आहे की, त्यांचं ठीक आहे, त्यांची मागणी होती, मराठा समाजाला आरक्षण द्या, ते दिल्या गेले आहे. मराठा समाजाला दहा टक्क आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण आम्ही टिकवणार असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खरं म्हणजे तो प्रश्न संपलेला आहे. मग कशासाठी हा आग्रह? हे कळण्याच्या पलिकडचं आहे, असा हल्लाबोल भुजबळ यांनी यावेळी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बाकीच्या काही गोष्टी आहे त्यावर आपण विचार केला पाहिजे. सारथी, बार्टी, महाज्योती या सारख्या संस्था आहेत. ज्या गोष्टी सारथीच्या माध्यमातून मिळतात त्यातील अनेक गोष्टी महाज्योतीच्या वाट्याला आलेल्या नाहीते. म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो, ओबीसीची संख्या मोठी आहे, त्यांना किमान समान वागणूक द्या. विद्यार्थ्यांना हे कळत नाही की पैसे कोण देतं? आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून पैसे येतात, विद्यार्थ्यांना एवढंच माहिती असतं की सरकार पैसे देतं, मात्र आम्ही या गोष्टी विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत. मग त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो, त्याला देतात मग मला का देत नाही, असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.
मुख्य सचिवांनी याच्यात लक्ष देऊन सर्वांना समान वागणूक कशी मिळेल ते बघावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. चांगलं काम चाललेलं आहे. मराठी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. पावसामध्ये, गणपती उत्सवामध्ये हे काय करणार आहे? मला काही कळत नाही. लोकांना का त्रास देतायेत? त्यांचं जर हेच म्हणणं असेल की ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, तर चार आयोगांनी आरक्षण नाकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टानेही फार मोठा जजमेंट दिलेलं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.