तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाला लढायला, भिडायला आणि आरे ला कारे करायला शिकवणारा माजी कर्णधार सौरव गांगुली अर्थात दादाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचा दिग्गज माजी कर्णधार आणि फलंदाज गांगुली लवकरच नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. गांगुली लवकरच एका संघासह मुख्य प्रशिक्षक अर्थात हेड कोच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. गांगुलीची हेड कोच हे पद स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. गांगुलीने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा कोच होण्याची इच्छा व्यक्त केली होती. टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयार असल्याच दादाने म्हटलं होतं. त्यानंतर आता दादाला ही मोठी संधी मिळाली आहे.
गांगुलीची दक्षिण आफ्रिकेतील SA20 च्या आगामी हंगामासाठी प्रिटोरिया कॅपिट्ल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रिटोरिया कॅपिट्ल्सने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
प्रिटोरिया कॅपिट्ल्सने या पोस्टमध्ये दादाचा कोलकात्याचा प्रिंस असा उल्लेख केलाय. तसेच सौरव गांगुली याला आमचा हेड कोच म्हणून जाहीर करताना खूप आनंद होत आहे”, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दादाची इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट याच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त होतं. ट्रॉटने गेल्या हंगामात प्रिटोरिया कॅपिट्ल्सच्या हेड कोचची सूत्रं हाती घेतली होती.
लवकरच ‘दादा’गिरी दिसणार
गांगुलीने भारताचं 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. गांगुलीने कसोटीत 7212 आणि वनडेत 11363 धावा केल्या. तसेच वनडेत 100 आणि कसोटीत 32 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. गांगुलीने आयपीएलमध्ये 59 सामनेही खेळले आहेत. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेट प्रशासनात निर्णायक योगदान दिलं. दादाने काही वर्ष बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला.
दरम्यान प्रिटोरिया कॅपिटल्सने पहिल्याच पर्वात अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. मात्र गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी राहिली. त्यामुळे यंदा सौरव गांगुली समोर टीमच्या कामगिरीत सुधारणा करण्याचं आव्हान असणार आहे. या आगामी हंगामाचा थरार 26 डिसेंबर 2025 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान रंगणार आहे.