मुंबईत वकिलाच्या घरी सापडलं मोठं घबाड; अधिकाऱ्यांचं सिनेस्टाइल सर्च ऑपरेशन
Tv9 Marathi August 24, 2025 09:45 PM

प्रभादेवीच्या SRA इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे. ॲड. निलेश हळदणकर यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. दिल्लीतील पथकाकडून गेल्या सहा दिवसांपासून ही छापेमारी सुरू आहे. दिल्लीतील पथक सहा दिवस प्रभादेवीत मुक्कामी होतं. छापेमारीत आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागल्याचं कळतंय. निलेश हळदणकर यांचा भाऊ पेशानं सीए आहे. त्यांच्या चेंबूरमधल्या घरीदेखील धाड पडली आहे.

प्रभादेवीतल्या एसआरए इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहणाऱ्या ॲड. निलेश हळदणकर यांच्या घरी आयकर विभागाच्या 10-12 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून छापेमारी सुरू होती. एसआरएच्या प्रक्रियेत निलेश आणि त्यांचा सीए भाऊ वैभव हळदणकर यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजता हे पथक हळदणकर यांच्या घरातून बाहेर पडलं. परंतु त्याआधी सहा दिवसांपासून पथकाकडून छापेमारी सुरू होती. या कारवाईदरम्यान त्यांनी घरातील सर्व सदस्यांचे फोन जप्त केले होते. प्रभादेवीच्या अहुजा टॉवरच्या बाजूची ही इमारत आहे.

कोण आहेत निलेश हळदणकर?

निलेश हळदणकर हे पेशाने वकील आहेत. SRA संदर्भातील सर्व कामं करून देतात, अशी माहिती आहे. गेल्या काही वर्षांत हळदणकरांनी जंगम मालमत्ता कमावली, असा आयकर विभागाला संशय आहे. हळदणकरांच्या घरातून आयकर विभागाने लाखोंची रक्कम आणि दागिने जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. सलग सहा दिवस आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. निलेश हळदणकरांनी दादर भागात अनेक फ्लॅट्सही खरेदी केल्याची माहिती आहे. हळदणकरांनी दादरच्या आगारबाजार भागात खरेदी केलेला फ्लॅट आयकरच्या रडारवर आहे. लाखोंचे व्यवहार रोखीच्या स्वरुपात केल्याने ॲड. हळदणकर आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत.

वकिलांचं स्पष्टीकरण

दरम्यान माझ्या घरी झालेल्या सर्च ऑपरेशनशी माझा थेट संबंध नाही, असं स्पष्टीकरण आयकर विभागाच्या कारवाईनंतर ॲड. निलेश हळदणकरांनी दिलं आहे. “दुसऱ्या कंपनीशी संबंधित सर्च ऑपरेशन होतं. आमच्या ट्रस्टच्या व्यवहारांच्या पडताळणीसाठी अधिकारी घरी आले होते,” असं ते म्हणाले. तर अजंठा आणि अन्वी फार्माशी संबंधित अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.