दादरचे मार्केट गर्दीने फुलले!
हरितालिका पूजन साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी
शिवडी, ता. २४ (बातमीदार) ः सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच मंगळवारी (ता. २६) हरितालिका तृतीया साजरी केली जाणार आहे. त्यामुळे दादर, परळ व लालबाग येथील बाजारपेठेत महिलांची हरितालिका पूजेचे साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे. गणेशोत्सव, हरितालिका, गौरी गणपती उत्सवाच्या खरेदीसाठी सध्या दादरचे मार्केट गर्दीने फुलले आहे.
येत्या दोन दिवसांत लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यंदा बुधवारी (ता. २७) गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा विराजमान होणार आहेत. तत्पूर्वी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका देवीचे पूजन केले जाते. हरितालिका देवीच्या मनमोहक मूर्ती, पूजनासाठी लागणारी विविध प्रकारची फळे आणि फुले, दुर्वा, तुळस, सुपारी, पाने, देवीच्या ओटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी (ता. २४) सुट्टीचा दिवस साधत महिलांनी गर्दी केली होती. दादर पश्चिम येथील फुल मार्केट दिवसभर गजबजले होते.
बाजारपेठेत हरितालिकेच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असून, या पूजेच्या वेळी वाळूची शंकराची पिंड करतात. त्यासाठी विक्रेत्यांनी वाळूची पाकिटेही विकायला सुरुवात केली आहे. हरितालिकेची मूर्ती, पत्री, वाळू आणि पूजा साहित्य असा एकत्र संच दुकानदारांनी २०० ते २५० रुपयांत उपलब्ध केले आहे, तर दोन देवी व शंकराची पिंड अशा वेगवेगळ्या मूर्तींची किंमत प्रति ६० ते १२० रुपये आहे. त्याचबरोबर मूर्तींचा दर्जा व आकार यानुसार त्याची किंमत वेगवेगळी आहे. तसेच सामाजिक माध्यमांवरून ऑनलाइन विक्री करणाऱ्या व्यावसायकांनी हरितालिका पूजा साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. ग्राहकांना हे साहित्य घरपोच देण्याची रीतसर व्यवस्था केली आहे.
हरितालिका व्रताचे महत्त्व
गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी येणाऱ्या ‘हरितालिका’ व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे व्रत आपल्या पतीसाठी भाद्रपद शुल्क तृतीयेला केले जाते. भगवान शंकर आपल्याला पती रूपाने, मिळावा यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत कुमारिकेपासून लग्न झालेल्या महिला करतात. विशेष म्हणजे दरवर्षी न चुकता महिला हे व्रत करतात. सौभाग्यप्राप्तीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजणी हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करताना दिसतात.