टोलमुक्ती केवळ नावालाच
फास्टॅगमुळे पैसे कापले; आनंदावर विरजण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : गणेशोत्सव म्हटला की, कोकणवासीयांची लगबग सुरू होते. ठाणे, मुंबई व आजूबाजूच्या शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी जात असतात. या चाकरमान्यांना टोलपासून माफी मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी टोलमाफीचा पास देण्यात येतो. त्यानुसार यंदादेखील अनेक चाकरमानी हे टोलपास घेऊन गणेशोत्सवासाठी निघाले; मात्र टोलमुक्तीचा आनंद क्षणिक ठरल्याचे दिसून आले. टोलनाक्यावर टोलपास दाखवल्यानंतरही अनेकांचे पैसे फास्टॅगमधून कापले गेल्याने फास्टॅगने टोलमुक्तीच्या आनंदावर विरजण फेरल्याचे दिसून आले.
राज्य सरकारने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली. गणेशोत्सवदरम्यान कोकणात जाणाऱ्या भाविकांना राज्य सरकारने टोलमाफी जाहीर केली आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४८), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ६६) तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील इतर रस्त्यांवरील टोलनाक्यांवर भाविकांना शुल्क भरावे लागणार नाही. या निणर्यामुळे कोकणात जाणाऱ्या खासगी वाहनधारकांसह एसटी महामंडळाच्या बसला मोठा दिलासा मिळणार आहे. टोलमाफीसाठी खास गणेशोत्सव २०२५, कोकण दर्शन असे पास जारी करण्यात सुरुवात झाली आहे. या पासवर वाहन क्रमांक व मालकाचे नाव यांसह प्रवासाचा तपशील नमूद करून ते वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध करून दिले जात आहेत.
शनिवारपासून ठाणे येथील शेकडो भक्त कोकणाकडे निघाले होते आणि त्यांनी टोलमुक्त पासही सोबत घेतला होता, मात्र टोलनाक्यावर टोलमुक्त पास दाखविल्यानंतरही अनेकांच्या फास्टॅगमधून टोलचे पैसे कट होत असल्याचे तक्रारी समोर आल्या आहेत. काहींनी तर फास्टॅग काढून ठेवला असतानादेखील त्यांना टोल भरल्याचा मेसेज मिळाला. त्यामुळे या टोलमुक्तीच्या आनंदावर विरजण पडल्याचे म्हटले.
आम्ही नियमानुसार टोलमुक्त पास घेतला. टोलनाक्यावर तो दाखवलादेखील; मात्र तरीदेखील फास्टॅगमधून टोलचे पैसे कापले गेले. त्यामुळे टोलमुक्त पास हा नावालाच होता का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
- शुभांगी कदम, ठाणेकर महिला.