डोंबिवलीत खड्डेमय रस्त्यांचा विळखा
esakal August 25, 2025 02:45 PM

डोंबिवलीत खड्डेमय रस्त्यांचा विळखा
नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
टिटवाळा, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली तसेच टिटवाळा परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात डॉ. मोहम्मद नशीम अन्सारी (५८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तीन जणांचे खड्ड्यांमुळे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिटवाळा गणेश मंदिरापासून गोवेली रोड, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल परिसर, जकातनाका, दळवीवाडा, एसबीआय बँकेजवळील रस्ता, स्थानक ते वाजपेयी चौक, बनेली रोड, निमकर नाका ते सावरकर नगर अशा प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली दिसत नसल्यामुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे. वाहनांचे टायर, सस्पेन्शन आणि इंजिन यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, नागरिकांना रोज प्रवास करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. शाळकरी मुले, नोकरदार, व्यापारी आणि तरुण-तरुणींना या वाईट रस्त्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी वारंवार रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली; मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांनी खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन करू असे इशारे दिले आहेत. भिवंडीत झालेल्या अपघातानंतर टिटवाळ्यातही भीतीचे वातावरण वाढले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी शहरातील खड्डे भरण्याचे काम तपासले. गणेशोत्सव महत्त्वाचा सण असल्याने त्याआधी संपूर्ण केडीएमसी क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ठेकेदारांकडून कामात निष्काळजी झाल्यास कठोर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांनी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले असले तरी पावसाने उघडीप दिल्यामुळे रात्री कामे करून दुरुस्ती वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात तातडीने खड्डे बुजवण्यासाठी पालिका कर्मचारी सज्ज राहणार आहेत.

नागरिकांची नाराजी
पालिका प्रशासनाने दावा केला आहे की, गणेशोत्सवापूर्वी एकाही रस्त्यावर खड्डा नसेल; मात्र टिटवाळा व भिवंडीतील भीषण अपघात आणि रस्त्यांची दुरवस्था पाहता नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दररोजचा प्रवास धोकादायक झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर टीका करत आहेत. गणेशोत्सव सांस्कृतिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांचे खड्डेमुक्त होणे अत्यंत तातडीचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.