ऐन गणेशोत्सवात आशा स्वयंसेविका मानधनविना
गणपतीपूर्वी मानधन मिळण्याची आशासेविकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : गणेशोत्सवापूर्वी मानधन द्यावे, अशी मागणी आशासेविकांनी केली आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे चार हजार गटप्रवर्तक व ७४ हजार आशा स्वयंसेविका अल्प मानधनावर कार्यरत आहेत. दर महिन्याला १ तारखेला वेळेवर मानधन मिळावे, या मागणीसाठी गेली अनेक वर्षे त्या आंदोलन करून पाठपुरावा करत आहेत. राज्यात गणेशोत्सव आता तोंडावर आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मानधन मिळावे व ते मानधन विनाविलंब वाटप करण्याची सूचना सर्व जिल्हा परिषद व महापालिकांना देण्यात यावी, अशी मागणी आशा स्वयंसेविकांची संघटना महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी केली आहे. यासोबतच, शासकीय कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी देण्याची मागणी केली आहे. आशा स्वयंसेविकांना गेल्या मे महिन्यापासून मानधन वेळेवर मिळाले नसल्याचेही सांगितले जात आहे.