मोखाडा, ता. २५ (बातमीदार) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यासाठी विविध पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी करून लढण्यात येणार असल्याचे नेत्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत, मात्र पालघर जिल्ह्यात महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकमेकांना या निवडणुका स्वबळावर लढण्याचे आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे.
पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर करून महायुतीतील घटक पक्षांना आव्हान दिले आहे. जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचा खासदार आणि तीन आमदार असल्याने जिल्ह्यात या पक्षाचा वरचष्मा आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाची भाषा करत आहेत.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन, ताज्या घडामोडींवर भाजपला सज्जड इशारा दिला. तसेच जिल्ह्यात शिवसेना मजबूत असून, पक्षातील अनेक असंतुष्ट पदाधिकारी आमच्या संपर्कात असल्याचे सांगत भाजपला डिवचले आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपलेही जिल्ह्यात मोठे अस्तित्व असून, आम्हाला कमी न समजण्याचा इशारा दिला आहे. मोखाड्यात वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्ता प्रवेशात पालघर जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी आपल्या पक्षाला सहकारी पक्षाने हलक्यात न घेण्याचा इशारा देत, स्वबळाची भाषा वापरून महायुतीतील घटक पक्षांना प्रतिआव्हान दिले आहे.
निवडणुकांच्या तारखा आणि जागावाटप होण्याअगोदरच महायुतीतील तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत कुठलीही वाच्यता न करता, महायुतीतील घडामोडी, आव्हाने आणि प्रतिआव्हानांची मजा घेतली जात आहे. महाविकास आघाडीत आगामी निवडणुका कशा लढल्या जातील, यावर कुठल्याही मोठ्या नेत्याने उघड भूमिका स्पष्ट केलेली नाही, मात्र महायुतीत एकत्र निवडणुका लढण्याची तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी घोषणा करूनही पालघर जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस इरेला पेटले आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत स्वबळाचा रणसंग्राम सुरू झाला आहे.