87204
कुडाळमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज
गणेशोत्सवाचे चोख नियोजनः नगरपंचायतीत आपत्ती कक्ष कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः येथील नगरपंचायत कार्यालयामार्फत गणेश चतुर्थीनिमित्त बाजार व वाहतूकीचे परिपूर्ण नियोजन केले आहे. यासाठी नगरपंचायत, पोलिस यंत्रणा, विविध संस्था या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.
गणेश चतुर्थीच्या कालावधीत नगरपंचायतीच्या मालकीचा हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका एस. टी. आगारापर्यंतचा रस्ता पूर्णपणे मोकळा राहील. उद्यापासून (ता.२५) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त ८ सप्टेंबरपर्यंत किरकोळ पथविक्रेत्यांना तसेच बुधवार आठवडा बाजारासह व्यापाऱ्यांना हॉटेल अभिमन्यू ते गुलमोहर हॉटेलपर्यंत व्यापार करण्यास सक्त मनाई राहील. नार्वेकर बेकरी ते भाट बिल्डींग तसेच नगरपंचायत पटांगण व भाजी मार्केट या ठिकाणी व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास परवानगी आहे.
अनंत मुक्ताई हॉटेल समोरील मोकळ्या जागेमध्ये तसेच न्यायालयाकडील मोकळ्या जागेमध्ये चारचाकी वाहनांना, तर जिजामाता चौक ते नक्षत्र टॉवरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकींना पार्किंग व्यवस्था निश्चित करून दिली आहे. पुष्पा हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर दुकानाच्या पुढे वाहन पार्किंग करत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या ठिकाणी ‘नो-पार्किंग’ केले आहे. सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत अवजड वाहनांना व चारचाकी वाहनांना मुख्य बाजारपेठेमध्ये येण्यास सक्त मनाई राहील.
या कालावधीमध्ये पोलिस खात्यातील कर्मचारी सतत कार्यरत असतील. आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावले आहेत. तक्रार निवारणासाठी नगरपंचायत कार्यालयामध्ये आपत्ती कक्ष स्थापन केला आहे. सर्व गणेश घाटांवरील रस्ते व त्याबाबतचे व्यवस्थापन बांधकाम विभागामार्फत केले आहे. विद्युत विभागानेही योग्य नियोजन केले आहे. गणेशघाटांवर साफसफाई व निर्माल्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
उद्यापासून ६ सप्टेंबरपर्यंत एसटी बस आर. एस. एन. हॉटेल, एस. आर. एम. कॉलेज, पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस, जुने बसस्थानक या एकेरी मार्गाचा वापर करतील. कणकवली पणदूर मार्गावरून येणाऱ्या बस आर. एस. एन. हॉटेल, कॉलेज चौक, पोलिस ठाणेमार्गे कुडाळ शहर बसस्थानकामध्ये येतील. सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, पणजी, कवठीकडे रवाना होणाऱ्या बसेस बस स्थानकात नोंद करून पंचायत समिती, काळाप नाका, नवीन बस स्थानक, आर. एस. एन. हॉटेलमार्गे पुढे मार्गस्थ होतील.