नवी दिल्ली : रामलीला मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करीत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारला युवकांची चिंता नसून सत्तेसाठी मतांची चोरी केली जात असल्याचा हल्लाबोल गांधी यांनी सोशल मीडियातून केला.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) परीक्षेत अनियमितता झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी रविवारी रामलीला मैदानावर आंदोलन केले होते. त्याचा संदर्भ देत गांधी म्हणतात की, शांततामय मार्गाने आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांवरील अमानुष लाठीहल्ला ही लज्जास्पद घटना तर आहेच पण हे घाबरट सरकारचे लक्षण आहे.
विद्यार्थ्यांच्या रोजगार आणि न्याय या दोनच मागण्या होत्या. मात्र त्यांना लाठ्या मिळाल्या. मोदी सरकारला युवकांची आणि त्यांच्या भविष्याची चिंता नाही. याचे कारण हे सरकार जनतेच्या मतांवर नव्हे तर मते चोरून सत्तेत आले आहे.
आधी मते चोरली. आता परीक्षा, नोकऱ्या, तुमचा हक्क आणि आवाज सगळेच हिसकावून घेतले जाणार. युवक, शेतकरी, सर्वसामान्य आणि अल्पसंख्यांकांचे मत यांना नको आहे. त्यामुळे वरील लोकांच्या मागण्या यांच्या प्राथमिकतेत नाहीत.
Himachal Pradesh: 'हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस'; ३०७ रस्ते बंद, वीजपुरवठा विस्कळितआता वेळ घाबरण्याची नाही तर निडर होऊन मुकाबला करण्याची आहे, असेही गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी देखील घटनेचा निषेध केला आहे.
लाठीमार झाला नसल्याचा दावा...रामलीला मैदानावर विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. पाचनंतर शंभर वगळता अन्य विद्यार्थी निघून गेले होते. या विद्यार्थ्यांना मैदानातून हटविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.