India US Tariff Tension : भारताच्या मजबूत भूमिकेने अमेरिकेची भाषा बदलली, तुम्ही पहिलं पाऊल टाका, मग ट्रम्प…US मधून मोठे संकेत
GH News August 28, 2025 02:17 PM

भारत-अमेरिका संबंध सध्या टॅरिफमुळे भरपूर ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर भारतात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्याशिवाय अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वारंवार भारत-पाकिस्तान संघर्षावरुन स्टेटमेंट देत आहेत, ते सुद्धा नाराजीच एक कारण आहे. अमेरिकेच्या टॅरिफवर भारताने आतापर्यंत फक्त तोंडी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण कुठलाही निर्णय घेऊन प्रत्युत्तर दिलेलं नाही. भारताच्या याच मौनी भूमिकेचा अमेरिकेला जाच होऊ लागलाय. म्हणून पुन्हा एकदा अमेरिकेकडून चर्चेचे संकेत देण्यात आले आहेत. अमेरिकेत 27 ऑगस्ट म्हणजे कालपासून भारतातून होणाऱ्या वस्तू आयातीवर 50 टक्के टॅरिफ लागू झालाय.

आता या सर्व विषयात भारताने पुढाकार घेऊन चर्चा करावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. म्हणूनच अमेरिकेने आता चर्चेसाठी संकेत दिले आहेत. अमेरिकेला या मुद्यावर भारत सरकारच्या टॉप लेवलसोबत पुन्हा चर्चा सुरु करायची आहे. भारताच्या कठोर भूमिकेनंतर अमेरिकी प्रशासनाने संकेत पाठवले आहेत. अमेरिकेची भारतविरोधी वक्तव्य ही त्यांच्या दबावाच्या रणनितीचा भाग आहेत.

अमेरिकेला भारताची साथ हवीच

चर्चा सुरु न केल्यास भारताशी संबंधित दुसऱ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा अमेरिकेने कारवाईची धमकी दिली आहे. काहीही झालं, तरी अमेरिकेला भारताला आपल्यापासून वेगळं करायचं नाहीय. म्हणूनच एवढं सर्व झाल्यानंतर ते पुन्हा चर्चेचे संकेत देत आहेत. अमेरिकेला भारत सहकारी, मित्र देश म्हणून हवा आहे.

तणाव त्यांनाही संपवायचाय

अमेरिकेने जापान, दक्षिण कोरिया या देशांवर डीलसाठी दबाव टाकला होता. रशिया आणि चीनसोबत भारताच्या वाढत्या जवळीकीमुळे अमेरिकेची रणनिती बदलली आहे. भारताने आधी पुढे यावं, मग ट्रम्प त्यांची भूमिका बदलतील असा अमेरिकेचा संदेश आहे. टॅरिफ वादात ट्रम्प यांना सुद्धा मोकळेपणाने चर्चा हवी आहे, असा त्याचा अर्थ होतो. भारतासोबतचा हा तणाव त्यांनाही संपवायचा आहे.

ट्रम्प यांचा अजब तर्क

भारत आपल्या तेल साठ्यातील 40 टक्के भाग रशियाकडून विकत घेतो. अमेरिका रशियाकडून होणाऱ्या या खरेदीवर नाराज आहे. म्हणून ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद करावी ही मागणी लावून धरली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवली, म्हणून रागावलेल्या ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. भारताच्या तेल खरेदीमुळे रशियाला पैसा मिळतो, त्याच पैशांचा ते युक्रेन युद्धात वापर करतात असा ट्रम्प यांचा तर्क आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.