Ganesh Festival 2025: विघ्न विनाशक गणराया या आनंदे; आज आगमन, उत्साह अन् एकतेच्या उत्सवास आतुरले सारे
esakal August 28, 2025 06:45 PM

-राहुल लव्हाळे

सातारा: गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव, उत्साह आणि एकतेचा सण. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा घरोघरी, मंडपामध्ये गणरायाचे आगमन होते, तेव्हा संपूर्ण वातावरण मंगलमय होते. अशा गणरायांचे आगमन उद्या (बुधवारी) होत आहे; पण मे महिन्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, निर्माण होत असलेली पूरस्थिती आणि शेतीवाडीचे झालेले नुकसान यासह अनेक संकटांची मालिका सहन करणाऱ्यांची विघ्ने दूर करण्याच्या पावलांनीच आता तू ये, अशी आर्त सादही जिल्ह्यातून घातली जाईल.

गणराया हे विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, सिद्धिविनायक आहेत. त्यांच्या पावलांमुळे दैनंदिन जीवनातील अडथळे, संकटे, दुःख दूर होतात, अशी श्रद्धा आहे. “हे गणराया, तुमच्या विघ्न विनाशक पावलांनी आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो.

संकटे दूर व्हावीत, सद्बुद्धी, ऐक्य आणि आनंद लाभो,” अशी प्रार्थना भक्तांकडून मनोभावे होईल. गणेशाचे आगमन केवळ मूर्तिपूजनापुरते मर्यादित नसते; तर ते आपल्यामध्ये नवा उत्साह, नवा उमेद आणि सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण करणारे असते.

ढोल-ताशांचा गजर, जय-जयकाराच्या घोषणांनी गावागावांत आणि शहरांत उत्साह भरून राहतो. सजावट, आरास, आरती, भजन यामधून भक्तिभाव प्रकट होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपलासा वाटणारा हा उत्सव पुन्हा एकदा आशेचा दीप लावून, संकटांवर मात करण्याची प्रेरणा घेत गणराया तुझ्या आगमनाने समृद्धीचा ठरो, अशी प्रार्थना आता घरोघरी होईल आणि “मोरया मोरया”च्या जयघोषात भेदाभेद विसरून एकता, प्रेम आणि भक्तीद्वारे संकटे नाहीशी होवोत, दुःखांचा अंधार दूर होवो, एवढीच अपेक्षा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.