श्री गणरायाचे आगमन झाले आहे. मूषकावर स्वार होवोनि गणनायक घरोघर अवतरले आहेत. सर्वांचे क्षेम करणार आहेत. अवघा आनंदीआनंद आहे. महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध भक्तांनी श्रीगणरायाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा करोन आपल्या आप्तांस घरी तीर्थप्रसादास बोलावले. काही स्वत:च उठून आप्तांच्या घरी गेले! काही २१ घरी जाऊन यायच्या तयारीने निघाले.
या नामवंत भक्तांपैकी काहींनी गणरायाकडे काही ना काही मागणे मागितले. मागणे हे मनोमन मागायचे असते. त्यामुळे ते ‘सूत्रां’ना कळणे कठीण जाते. पण सूत्रेसुध्दा कमी नाहीत. ती मनातही डोकावतातच. सूत्रांची ही पोहोच बघून देवादिकही चक्रावतील!! त्यानुसार भक्तांच्या मागण्यांबद्दल आम्हाला सूत्रांनी माहिती पुरवली. निवडक सुप्रसिद्ध भक्तांनी देवाकडे मागितलेले खरेखुरे मागणे आम्ही येथे देत आहोत.
नानासाहेब फडणवीस : देवाऽऽ,…तुम्हाला देवाऽऽ अशी हाक मारली की मी स्वत:च दचकून ‘ओऽऽ’ देतो. मग ओशाळतो! भक्ताकडे लक्ष असू द्या, देवा! हल्ली लोक फार शिव्याशाप देऊ लागले आहेत. त्यांना आवरा! मी घट्ट पाच वर्ष टिकून राहीन, असं काही तरी करा, देवा! मी दिल्लीला जावे, म्हणून काही लोकांनी तुम्हाला पाण्यात ठेवलं असेल तर त्यांना चांगला प्रसाद द्या.
गेले काही महिने आमचे ठाण्याचे मित्र कर्मवीर भाईसाहेब माझ्याकडे बघून एकदाही हसलेले नाहीत. त्यांना हसू फुटेल या आशेने मी त्यांना डझनभर जोक व्हाटसॲपवर पाठवले. पण ढिम्म! ते हसतील असे काहीतरी करा. आमचे महायुतीतले दुसरे मित्र दादासाहेब बारामतीकर समोर आले की खुदकन हसतात. मी खचतो! त्यांचे हसू घालवा!! बाकी सगळे मी बघून घेतो…मोरया!!
कर्मवीर भाईसाहेब : मी तेव्हा सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो, आता डेडिकेटेड कॉमन मॅन आहे, असे मी सगळ्यांना सांगत होतो. पण ते मी आता बंद केले आहे. कारण लोक ते सीरिअसली घेतायत, असा मला वहीम आला!! मला पुन्हा डीसीएमचे सीएम व्हायचे आहे, देवा! दिल्लीच्या हायकमांडला तशी तुम्ही कमांड दिलीत तर काम होऊन जाईल. येवढं कराच देवा!! मोरया!!
दादासाहेब बारामतीकर : मी रेकॉर्ड ब्रेक डीसीएम आहे. माझ्याएवढा वेळ डीसीएम असलेली व्यक्तीच नाही. पण तिथंच आमचं गाडं अडलंय. पुढेच जात नाही! देवा, आमच्या करिअररुपी कॉर्ब्युरेटरमधला कचरा काढून गाडी धक्का ष्टार्ट करावी, आणि एकदाचं फायनल डेस्टिनेशन येऊ द्या, येवढंच माझं मागणं आहे. द्या की औंदा एवढं जमवून. मोरया!!
उधोजीसाहेब : देवा गणराया, आज तो बहुत खुश होंगे तुम…आँय! शिवाजी पार्कला तुझ्या दर्शनासाठी आलोय…माझ्या महाराष्ट्रातला माझा शेतकरी आज सरकारच्या नावानं खडे फोडतोय. मीसुद्धा सरकारच्या नावानं खडे फोडतोय. सगळी जनता खडे फोडतेय…पण आज मी तुझ्या दारी आलोय. येणारच. का नको येऊ? आलंच पाहिजे. आल्याशिवाय राहणार नाही. कोण अडवतं ते बघतोच.
अँब्युलन्स घेऊन या म्हणावं, त्यातच परत पाठवीन, हाँऽऽ…! साकडे म्हणून मी अडीच-तीन फूट लांबीची यादीच तुमच्याकडे आणली आहे. बंद दाराआड तुमच्या चरणी ठेवतोय. काहीतरी करुन हे घडवाच… मोरया!!
राजेसाहेब : कोण आहे रे? हां, हे आपले घरचेच आहेत…या, या, यांना खटॅककन प्रसाद द्या रे कुणीतरी! टाळी नाही रे, प्रसाद द्या! देवा, सगळ्यांच्या मनासारखं करतोस, माझ्या मनासारखं एकदा तरी कर! एकदा (तरी) संधी देऊन बघा, असं मी दाताच्या कण्या करुन सांगतोय, पण व्यर्थ! मोरया!