पुणे : ‘‘सध्या मतचोरीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी फिरत आहेत. मात्र, त्यांनी आधी काँग्रेसची यंत्रणा सुधारण्यासाठी काम करावे. बूथ पातळीवरील यंत्रणा संपुष्टात आली आहे. पक्ष नेस्तनाबूत झाल्यावर दुसऱ्याला दोष द्यायला नको,’’ अशी टीका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, असेही गोरे यांनी सांगितले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसवर टीका करताना गोरे म्हणाले, ‘‘काँग्रेसने संघटना सुधारली पाहिजे, बूथ समिती, कार्यकर्ता भक्कम केला पाहिजे. हे न करता व्यवस्थेला दोष देणे योग्य नाही. बिहारप्रमाणे महाराष्ट्रात मतदारांची तपासणी करण्यास कोणी अडविलेले नाही. काँग्रेसची बूथ पातळीवरील यंत्रणा संपुष्टात आली आहे. भाजपची बूथ पातळीवरील यंत्रणा सक्षम आहे. भाजपने नवमतदार नोंदणीमध्ये निवडणूक आयोगापेक्षाही अधिक चांगले काम केले असल्याचे माझे व्यक्तिगत मत आहे.’’
गोरे म्हणाले, ‘‘मतचोरीचा मुद्दा मांडून देशात अशांतता व अस्वस्थता पसरविण्यात येत आहे. भाजपकडून वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी बूथ पातळीवर केली. काँग्रेसची अशी यंत्रणा आता अस्तित्वात नाही. भाजपची यंत्रणा सातत्याने कार्यरत असते. त्यामुळे निवडणुकीसाठी आम्ही केव्हाही तयारीत आहोत.’’ तसेच गोरक्षकांच्या प्रश्नावर गोरे म्हणाले, ‘‘गोरक्षण झाले पाहिजे, पण त्याच्या आडून जर कोणी गैरफायदा घेत असेल तर योग्य नाही.’’
‘मुख्यमंत्र्यांना टार्गेट करून आंदोलन’मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी विचारलेल्या प्रश्नावर गोरे म्हणाले, ‘‘मनोज जरांगे आंदोलन का करत आहेत, ते मला माहीत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून हे चालले आहेत. मराठा समाज बांधवांना जे अपेक्षित आहे, ते त्यांना दिले आहे. फडणवीस यांनी दहा टक्के आरक्षण दिले. आंदोलनामुळे जे चालले आहे, ते योग्य नाही, असे मला वाटते.’’