आरएसएसच्या शताब्दी सोहळ्याचा आजचा तिसरा दिवस प्रश्नोत्तराचा होता. या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, भागवत यांनी देखील त्या प्रश्नांची उत्तर दिली. त्यापैकी एक प्रश्न असा विचारण्यात आला की, सध्या तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाचं युग आहे. या युगामध्ये संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या आव्हानाकडे संघ कसा पाहतो, याला उत्तर देताना भागवत यांनी म्हटलं की, तंत्रज्ञान आणि आधुनिकता शिक्षणाच्या विरोधात नाही. जसं मनुष्याचं ज्ञान वाढतं, तसं नवीन तंत्रज्ञान विकसीत होतं. तंत्रज्ञानाचा कुठे आणि कसा वापर करायचा हे मानवाच्या हातात आहे. तंत्रज्ञाचे जे दुष्परिणाम आहेत, त्यापासून वाचायला हवे. तंत्रज्ञान हे मानसाचे गुलाम पाहिजे, माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम बनता कामा नये. यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षणाचा उद्देश हा केवळ एखादी माहिती लक्षात ठेवणे एवढाच नाही, तर मानवाला सुसंस्कृत बनवणे हा खरा उद्देश आहे.
नव्या शिक्षण धोरणाची आवश्यकता
पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या देशातील शिक्षण हे अनेक वर्षांपूर्वीच नामशेष झाले किंवा ते करण्यात आले. आपल्या देशावर राज्य करण्यासाठी नवीन शिक्षण धोरणाची निर्मिती करण्यात आली. परंतु आज आपण स्वतंत्र आहोत. त्यामुळे आता अशा शिक्षण धोरणाची गरज आहे, जे केवळ राज्य चालवण्यासाठी नाही तर लोकांची काळजी घेण्यासाठी देखील प्रेरणा निर्माण करू शकेल.
कोणतीही भाषा शिकण्यास अडचण नसावी
भागवत यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, आपण इंग्रज नाहीत, आणि आपल्याला इंग्रज बनायचं देखील नाही. मात्र इंग्रजी ही एक भाषा आहे आणि ती शिकण्यास कोणतीही अडच नसावी. संगीत- नाट्य या विषयांमध्ये देखील लोकांना रस निर्माण व्हायला हवा, मात्र कोणताही विषय सक्तीचा करता कामा नये. ज्या विषयाची सक्ती केली जाते, तो विषय नंतर सर्वांसाठीच एक मोठी समस्या बनते.
तीन मुलं हवीत त्यापेक्षा आधिक नाही
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये जन्म दराचा देखील उल्लेख केला आहे, कमीत कमी तीन अपत्य हवीत, असं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी तीन मुलं होऊ दिली नाहीत ते काळाच्या ओघात नष्ट झाले. डॉक्टर देखील सांगतात तीन अपत्यांना जन्म दिला तर तिघांचे आरोग्य देखील उत्तम राहाते, सोबतच ते अॅडजेस्ट करायला देखील शिकतात, त्यामुळे तीन अपत्य हवीत त्यापेक्षा जास्त नको असं भागवत यांनी म्हटलं आहे.