पुणे : एरोमॉलमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या कॅबना आता बाहेर पडण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, कारण एरोमॉल प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक मार्गिका करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे करताना दुचाकीची एक मार्गिका कमी होणार आहे. येत्या आठवडाभरात बदल होईल. त्यामुळे एरोमॉलमधून बाहेर पडणाऱ्या चारचाकींना वेळ लागणार नाही.
एरोमॉलमध्ये पुणे विमानतळावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांच्या चारचाकी व दुचाकीची पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीच्या तुलनेत चारचाकीची संख्या जास्त आहे. दिवसाला सुमारे सहा हजार चारचाकीची येथून वाहतूक होते. यात प्रवाशांच्या खासगी वाहनांसह कॅबची संख्या देखील जास्त आहे. काही दिवसांपासून एरोमॉलमध्ये कॅबची कोंडी होत असल्याने प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी किमान अर्धा तास ते एक तास वाट पहावी लागते.
रात्रीच्या वेळी तर वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त आहे. हे लक्षात घेऊन एरोमॉल प्रशासनाने मॉलच्या बाहेर पडणाऱ्या मार्गावर असलेल्या चारचाकीची मार्गिका वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एरोमॉलमध्ये चारचाकीसाठी ३ व दुचाकीसाठी २ असे पाच मार्गिका आहेत. चारचाकीची संख्या तुलनेने जास्त असल्याने एरोमॉल प्रशासनाने चारचाकीसाठी मार्गिका एकाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता चारचाकीसाठी ४ व दुचाकीसाठी १ मार्गिका असणार आहे. एका आठवड्यात ही नवी व्यवस्था लागू होईल. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. त्यांना बाहेर पडण्यासाठी आता जास्त वेळ लागणार नाही.
एरोमॉलमध्ये चारचाकीचे प्रमाण जास्त असल्याने सतत वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. असे प्रकार कमी करण्यासाठी चारचाकीची आणखी एक मार्गिका वाढवली जाणार आहे.
- युवराजसिंग रजपूत, उपाध्यक्ष, एरोमॉल, पुणे विमानतळ