ई-पीक पाहणीचा सर्व्हर डाऊन
कामे खोळंबली; अनेक गावांमधील शेतकरी अडचणीत
जव्हार, ता. २८ (बातमीदार) : मुसळधार पाऊस पडणाऱ्या जव्हार तालुक्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, या भागात भात, नागली, वरई, उडीद यासारखी पिके घेतली जातात. चार महिने खरिपातील शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर उरलेले आठ महिने गुजराण करणे असा नित्यक्रम येथे गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे, मात्र बे मोसमी पडणारा पाऊस वातावरणातील बदल पिकांवर पडणारे विविध रोग यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणून शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा सारख्या नामी संधी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांना आधार मिळत आहे, मात्र गेल्या १५ दिवसांपासून ही पीक पाहणीचा सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.
ई-पीक पाहणी पोर्टल सतत डाऊन होत आहे. त्यामुळे नोंदणी न होऊ शकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून, दुसरीकडे तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे पीक विम्यासाठी अर्जही करता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पीक नुकसानभरपाई मिळावी या आशेने शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून विमा हप्ता जमा केला, मात्र ई-पीक पाहणी नोंदणी न झाल्यास विमा मंजूर होणार नाही, यामुळे शेतकरी मोबाईलवर नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण सततचा सर्व्हर डाऊन आणि नेटवर्क अडचणींमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. विशेषतः पिंपळशेत, खरोंडा, वनवासी, बाळ कापरा, न्याहाळे व तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी या अडचणीत अडकले आहेत.
चौकट
शेतकऱ्यांचा रोष
तांत्रिक अडचणीसोबतच महसूल विभागातील मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना ‘शेती फेर’ करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तलाठी वेळेवर कार्यालयात नसणे, कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे, तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहाराशिवाय फेर प्रस्ताव निकाली काढू नये, असा अघोषित आदेशच दिल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
चौकट
मदतीची मागणी
ई-पीक पाहणी पोर्टल तातडीने सुरळीत करावे, पीक विमा अर्जांची अंतिम तारीख वाढवावी, महसूल विभागाच्या कारभारावर चौकशी करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी.
कोट (लता धोत्रे-फोटो)
ज्या शेतकऱ्यांना पीक विमा, ई-पीक पाहणी किंवा अन्य काही समस्या येत असल्यास त्यांनी जव्हार तहसील कार्यालयात संपर्क करावा.
लता धोत्रे, तहसीलदार, जव्हार