Arun Gawli: अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन; १७ वर्षांनंतर तुरुंगातून होणार सुटका
esakal August 29, 2025 11:45 PM

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन डॅडी ऊर्फ अरुण गवळीचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. गवळी संध्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे. या निकालामुळे त्याला १७ वर्षानंतर दिलासा मिळाला आहे.

न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. गवळीसह इतर आरोपींना २००६ मध्ये जामसांडेकर हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आली होती. मुंबईच्या सत्र न्यायालयाने ऑगस्ट २०१२ मध्ये गवळीला आजीवन कारावासाच्या शिक्षेसह १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

गवळीने सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु, उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर २०१९ रोजी गवळीच्या आजीवन कारावासाच्या शिक्षेला कायम ठेवले. त्यानंतर गवळीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ही याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, गवळीने केलेल्या जामिनासाठीचा अर्ज तूर्त न्यायालयाने मंजूर केला.

सत्र न्यायालय करेल अटी निश्चित गवळी गेल्या १७ वर्षे आणि तीन महिन्यांपासून तुरुंगात आहे. परंतु, त्याचे वय आता ७६ आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने ठरविलेल्या अटींच्या आधारे जामीन मंजूर करत असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयातून त्याला अटी निश्चित कराव्या लागणार आहे.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

यानंतरच त्याची तुरुंगातून सुटका होईल. या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये निश्चित करण्यात आली होती. गवळीतर्फे ॲड. शंतनू हाडकर आणि ॲड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. चिंचपोकळीचा आमदार अरुण गवळीने अखिल भारतीय सेना नावाची स्वतःची राजकीय पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाच्या माध्यमातून गवळीने मुंबईच्या चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि २००४ ते २००९ पर्यंत आमदार राहिला. गवळी मुंबईतील बायखळाच्या दगडी चाळ परिसरातून चर्चेत आला आणि नंतर राजकारणात सक्रिय झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.