ऐन गणेशोत्सवात रिक्षांचा तुटवडा
नोकरदारांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांनी गावाची वाट धरली आहे. अशातच, रिक्षाचालकांनीही गणपतीसाठी सुट्टी घेतल्याचे मंगळवारी (ता. २६) चित्र ठाण्यात पाहायला मिळाले. ठाणे स्थानक परिसरासह विविध भागामध्ये रिक्षांचा तुटवडा भासत असल्याने नोकरदारांचे हाल झाले. सकाळी आणि सायंकाळी हीच परिस्थिती होती.
ठाणेकरांवर कोंडी आणि रिक्षांच्या तुटवड्याची समस्या उभी ठाकली आहे. ठाण्यातून हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात मूळ गावी गेले आहेत. यामध्ये शेकडो रिक्षाचालकांचाही समावेश आहे, तर भूमिपूत्र किंवा ठाण्यातील स्थायिक रिक्षाचालकांच्या घरीही गणपती असल्यामुळे त्यांनी रजा घेतली आहे. त्यामुळे शहरातील शेअर आणि मीटर रिक्षा थांब्यावर मंगळवारी सकाळपासून प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानक परिसरातील बी केबीन, गावदेवी मंदिर आदी भागामध्ये रिक्षाच्या शोधासाठी प्रवासांची पायपीट होत होती.
कोंडीत भर
शहराच्या अंतर्गत मार्गावर एसटी बसेसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यात मंगळवारी ठिकठिकाणी बाप्पाला घरी घेऊन जाणाऱ्यांची गर्दी वाढली होती. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर कोंडीही झाल्याचे दिसत होते. त्यामुळे बसेसही खोपट, कॅडबर जंक्शन, शिवाई नगर, कळवा पूल आदी भागामध्ये अडकल्याचे दिसले.