बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असा बीसीसीआयचा जगभरात लौकीक आहे. बीसीसीआयचा क्रिकेट विश्वात गेल्या अनेक वर्षांपासून दबदबा आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बीसीसीआयची ताकद आणखी वाढली आहे. बीसीसीआयने अनेकदा आपल्यासमोर पीसीबीला झुकवलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे होता. मात्र फक्त भारतासाठी यजमान असूनही पाकिस्तानला त्रयस्थ ठिकाणी सामने खेळावे लागले. बीसीसीआयने अनेकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. तसेच बीसीसीआयने अफगाणिस्तान आणि नेपाळ या इतर संघाच्या तुलनेत नवख्या असलेल्या संघांना सहकार्यही केलं आहे.
बीसीसीआयची कायमच चर्चा पाहायला मिळते. बीसीसीआयमध्ये अनेक पदाधिकारी आहेत. मात्र अध्यक्ष आणि सचिव यांची चर्चा पाहायला मिळते. खेळाडूंचं जसं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न असतं. तसंच अनेकांचं बीसीसीआय अध्यक्ष होण्याचं स्वप्न असतं. मात्र ती संधी प्रत्येकालाच मिळत नाही. बीसीसीआय अध्यक्षाकडे क्रिकेट विश्वाला प्रभावित करण्याची ताकद असते. मात्र बीसीसीआय अध्यक्षाला वेतन किती मिळतं? हे जाणून घेऊयात.
बीसीसीआय अध्यक्षाला पगार म्हणून किती रक्कम मिळते? याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळतं. मात्र बीसीसीआय अध्यक्षाला पगार मिळत नाही. मात्र बीसीसीआय अध्यक्षाला अनेक भत्ते मिळतात. या भत्त्यांद्वारे अध्यक्षाची रग्गड कमाई होते.
भारतीय संघाने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकला होता. रॉजर बिन्नी हे त्या वर्ल्ड कप विजेत्या संघात होते. रॉजर बिन्नी यांच्याकडे गेली काही महिने बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे बिन्नी यांना अध्यक्षपद सोडावं लागलं आहे. बीसीसीआय अध्यक्षपदासाठी सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. तो पर्यंत राजीव शुक्ला यांना अंतरिम अध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी निवडणूक होईपर्यंत राजीव शुक्ला सर्वेसर्वा असणार आहेत.
बीसीसीआयच्या संविधानानुसार, बीसीसीआय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष ही मानद पदं आहेत . त्यामुळे ही पदं भूषवणाऱ्यांना बीसीसीआयकडून मासिक वेतन दिलं जात नाही. मात्र या सर्वांना अनेक भत्ते मिळतात.
अनेक बैठकांसाठी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना देशासह विदेशात प्रवास करावा लागतो. बीसीसीआयकडून अधिकाऱ्यांना प्रत्येक बैठकीसाठी ठराविक रक्कम दिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या भारतात होणाऱ्या कोणत्याही बैठकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि अन्य पदाधिकाऱ्यांना एका दिवसासाठी प्रत्येकी 40 हजार रुपये भत्ता दिला जातो. तर विदेशात होणाऱ्या बैठकीसाठी एका दिवसासाठी प्रत्येकी 1 हजार डॉलर दिले जातात.
तसेच भारतात बैठकीव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी एका दिवसासाठी प्रत्येकी 30 हजार रुपये दिले जातात. तसेच अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा विमान प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च बीसीसीआयकडून केला जातो.