नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून महायुतीमध्ये वाद रंगत असतानाच साधु-महंतांना नियोजनात सहभागी न केल्याची खंत व्यक्त होत होती. या नाराजीला दूर करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (ता. २८) पंचवटीतील भक्तिधाम येथे साधु-महंतांची भेट घेऊन संवाद साधला.
या वेळी अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती, आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते भक्तिचरणदास महाराज, कैलास मठाचे महंत स्वामी संविदानंद सरस्वती, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, तपोवनातील बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे रामशरणदास महाराज, महंत माधवदास राठी व तुषार भोसले आदी संत-महंत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की साधुग्रामसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे सुरू असून, दीर्घ कालावधी लागणाऱ्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. सर्व कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासन दक्ष राहील. साधु-महंतांशी नियमित संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊ आणि सूचनांची अंमलबजावणी प्राधान्याने करू. या वेळी साधु-महंतांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वात 'आदि कर्मयोगी अभियान' यशस्वी करण्याचे निर्देशआज प्रशासनाचा त्र्यंबकेश्वर दौरा
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा त्र्यंबकेश्वर दौरा शुक्रवारी (ता. २९) होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी, त्र्यंबकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी तसेच इतर प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. सर्व अधिकारी दहा आखाड्यांमध्ये जाऊन तेथील प्रमुख साधु-महंतांशी संवाद साधणार आहेत.