Mumbai News: कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा! भर पावसातही मराठा आंदोलक ठाम, आरक्षणासाठी आरपारची लढाई
esakal August 30, 2025 03:45 PM

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन आज मुंबईत धडकले. आझाद मैदान चिखलाने आणि पाण्याने भरले असतानाही आंदोलकांनी हार न मानता ठिय्या दिला. “आता आरक्षण घेऊनच परत जाणार” हा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील सकाळीच आझाद मैदानात दाखल झाले आणि ठरल्याप्रमाणे उपोषणास सुरुवात केली. अधिकृत परवानगी फक्त काही मोजक्या आंदोलकांनाच होती, तरीदेखील मराठा समाजाचे कार्यकर्ते बंदी झुगारून सीएसएमटी, महापालिका चौक आणि आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले. परिणामी संपूर्ण दक्षिण मुंबई आंदोलकांनी फुलून गेले.

Pratap Sarnaik : विरार दुर्घटनेतील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात मिळणार म्हाडाची घरे, परिवहन मंत्र्यांचा निर्णय

दरम्यान, सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर वाढला. मैदानात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. तरी आंदोलक मागे हटले नाहीत. काहींनी पावसात भिजत चिखलात उभे राहून घोषणाबाजी केली, तर काही थेट चिखलात बसून आंदोलनात सहभागी झाले. रेनकोट, छत्र्या घेऊन आलेल्यांनी त्या आधारावर सहभाग नोंदवला, तर इतर आंदोलक पावसात भिजतच संघर्ष करत राहिले.

जरांगे पाटील म्हणाले त्याप्रमाणे, “आता ही लढाई आरपारची आहे. आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार. आंदोलक ऊन, वारा, पाऊस काहीही आले तरी हटणार नाहीत. आम्ही अर्धी भाकर खाऊ, उघड्यावर राहू; पण आदेशापासून ढळणार नाही.”

आजच्या आंदोलनातमहिलांची उपस्थिती कमी होती, मात्र तरुणांचा मोठा जमाव उपस्थित राहिला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे तरुण आंदोलन कितीही दिवस चालले तरी ठामपणे टिकून राहणार असल्याचे सांगत होते. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांचा ओघ सुरूच होता, ज्यामुळे आझाद मैदान परिसर घोषणाबाजीने आणि संघर्षाच्या तापाने पेटून राहिला.

"पाऊस, चिखल आणि प्रतिकूल परिस्थिती कितीही आली तरी मराठा समाजाचा निर्धार ढळलेला नाही. आंदोलनावर ठाम राहून ते आपली मागणी अधिक जोमाने मांडणार आहोत."

- मदन यादव , आंदोलक

"आरक्षणासाठीची ही झुंज आता निर्णायक टप्प्यात आलेली आहे. आंदोलकांचा उत्साह आणि एकजूट पाहता ही लढाई मागे हटणारी नाही, तर अंतिम निकालापर्यंत चालणारी आहे."

- दिलीप वरपे , आंदोलक

Cyber Crime: गणेशोत्सवात सायबर भामट्यांचे जाळे! घरपोच प्रसाद, व्हीआयपी दर्शनाचे प्रलोभन

"मनोज जरांगे पाटलांचा अढळ निर्धार आणि नेतृत्वामुळे आंदोलनाला नवा जोश मिळत आहे. त्यांचे शब्दच आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत."

- मिठू म्हस्के , आंदोलक

"तरुणाईचा वाढता सहभाग हेच या आंदोलनाचे बलस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या तरुणांच्या ओघामुळे आंदोलन थांबणार नाही, असा ठाम संदेश मुंबईतून गेला आहे."

- अविनाश गायकवाड , आंदोलक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.