जुन्नर - पुणे जिल्हा परिषदेच्या १६८ शिक्षकांची पदोन्नतीद्वारे मुख्याध्यापक पदी वर्णी लागली आहे. पुणे जिल्हा परिषद येथे शरदचंद्र पवार सभागृहामध्ये ता. २८ रोजी मुख्याध्यापक पदोन्नती समुपदेशन प्रक्रिया पार पडली. यामुळे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या पाठपुराव्यास यश मिळाले असल्याचे जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात मुख्याध्यापकांची सुमारे २५० पदे रिक्त होती. विद्यार्थी गुणवत्तेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत होता. ही पदे पदोन्नतीने तातडीने भरावी यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करण्यात येत होता.
प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन पदोन्नती प्रक्रिया संपन्न केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकारी संजय काळे, विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे, कक्ष अधिकारी राजेश खंदारे, केदारी, शिल्पा रासकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा मागोवा घेत गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली.
नासा इस्त्रोसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी कॉफी विथ सीईओ हा उपक्रम घेतला आहे. भविष्यात शिक्षकासाठी कॉफी विथ सीईओ कार्यक्रम घेणार आहोत. या कार्यक्रमाला दर्जेदार व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित केले जाईल. मॉडेल स्कूल उपक्रमासाठी तालुका निहाय बैठका घेण्यात येत आहेत असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक राजाभाऊ जगताप, नेते महादेव गायकवाड बारामती तालुकाध्यक्ष राहुल होळकर, बापू खरात आदी उपस्थित होते.