पुणे : विवाह न करता एकत्र राहत असलेल्या (लिव्ह इन रिलेशनशिप) दाम्पत्याची मुलगी सोनिया (नाव बदललेले) जेव्हा वयात आली, तेव्हा तिच्या बापाचीच वाईट नजर तिच्यावर पडली अन् ती लैंगिक अत्याचाराची शिकार झाली. याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्यासह आईला जिवे मारण्याची धमकीही सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या बापाने दिल्याने तिने हा प्रकार आईलाही न सांगता सहन करत होती. या अत्याचाराला कंटाळून एक दिवस गाडीखाली जाऊन आत्महत्या करण्याचा सोनियाचा प्रयत्न तिच्या मैत्रिणीमुळे फसला. त्यानंतर खरे कारण समोर आले, असे औंध जिल्हा रुग्णालयातील अत्याचारग्रस्त बालकांना समुपदेशन, वैद्यकीय व कायदेशीर मदत देणाऱ्या ‘होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन’च्या समुपदेशिका दीप्ती कोरडे यांनी सांगितले.
‘लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमा’अंतर्गत (पॉक्सो) पोलिसांकडून दाखल होणाऱ्या अठरा वर्षांच्या आतील पीडित बालके जेव्हा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी येतात, तेव्हा ही संस्था त्यांना पुढील वैद्यकीय तपासणी, समुपदेशन, शासकीय योजनांची माहिती या सर्व सेवा कुठेही न जाता एकाच जागी पुरवते. म्हणून त्याला त्यांनी ‘वन स्टॉप सेंटर’ असेही नाव दिले आहे. राज्यातील हा एकमेव प्रकल्प आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.
सोनियाने मैत्रिणीला तिच्या बापाकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. तिच्या मैत्रिणीने ही बाब शेजारील एका महिलेला सांगितली. तिने सोनियाच्या आईला ती कामावर गेल्यावर नराधम बाप दुपारी अत्याचार करत असल्याची माहिती दिल्यानंतर तिच्याही पायाखालची वाळू सरकली. अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांच्या माध्यमातून सोनिया जिल्हा रुग्णालयातील सेंटरमध्ये दाखल झाली. दरम्यान, याबाबत तिच्यावर अत्याचार करणारा बार फरार झाला होता. पोलिसांकडूनही आरोपीला पकडण्यात दिरंगाई होत होती. या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा विधी प्राधिकरण, पोलिसांच्या भरोसा सेलला पत्रव्यवहार केला. त्यानंतर सूत्रे हलली व दोन महिन्यांनी त्याला अटक झाली.
शंभराहून अधिक जणांना मदतबाल लैंगिक शोषण पीडित बालकांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालय व ‘होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन’ स्वयंसेवी संस्थेतर्फे उपक्रम राबविला जात आहे. जिल्हा रुग्णालयात एप्रिल २०२४ मध्ये प्रकल्प सुरू झाला. त्याद्वारे आतापर्यंत शंभराहून अधिक अत्याचारग्रस्त मुली व मुलांना मदतीचा हात मिळाला आहे.
बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये बऱ्याच वेळेला बालके माहिती सांगायला घाबरतात. मात्र, त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्यावर होतात. त्यासाठी पालकांनी आजूबाजूच्या मुलांबाबत सतर्क राहून अशा घटनांबाबत तक्रार करायला पुढे येणे आवश्यक आहे. येथे एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत शंभराहून अधिक बालकांना विविध प्रकारची मदत मिळाली आहे.
- दीप्ती कोरडे, समुपदेशक, ‘चाइल्ड फ्रेंडली वन स्टॉप सेंटर’, औंध जिल्हा रुग्णालय