पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या जपान दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी जपानमधून एक चांगली बातमी आलीय. जपानच्या अनेक कंपन्या भारतात जवळपास 1.15 लाख कोटी रुपये (13 बिलियन USD) गुंतवणूक करण्यासाठी तयार झाल्या आहेत. या गुंतवणूकीसाठी 170 पेक्षा जास्त MoUs वर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. ही गुंतवणूक स्टील, ऑटोमोबाइल, रिन्यूवल एनर्जी, सेमीकंडक्टर, रिअल एस्टेट आणि एयरोस्पेस सारख्या क्षेत्रांमध्ये होणार आहे. कंपन्यांच्या या निर्णयातून जपानचा भारताच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास दिसून येतो.
या कंपन्या करणार मोठी गुंतवणूक
1. निप्पॉन स्टील (AM/NS इंडिया): गुजरातमध्ये 1,500 कोटी रुपयांचा विस्तार आणि आंध्र प्रदेशात 5,600 कोटी रुपयांच्या एकीकृत स्टील प्लान्टमध्ये गुंतवणूक करणार.
2. सुजुकी मोटर : गुजरातमध्ये नवीन प्लान्ट लावण्यासाठी 35,000 कोटी रुपये आणि प्रोडक्शन वाढवण्यासाठी 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.
3. टोयोटा किर्लोस्कर: कर्नाटकमध्ये 3,300 कोटी रुपयांचा विस्तार आणि महाराष्ट्रात 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक नवीन प्लान्टसाठी करणारं.
4. सुमितोमो रियल्टी : रियल एस्टेटमध्ये 4.76 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार.
5. JFE स्टील: इलेक्ट्रिकल स्टील उत्पादनाला मजबूत बनवण्यासाठी 44,500 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार.
या दौऱ्याच महत्त्व काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 ऑगस्ट असे दोन दिवस जपान दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते टोक्योमध्ये पोहोचले. पंतप्रधान मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक परिषदेत सहभागी होतील. ते जपानी पंतप्रधान शिगेरु इशिबा यांची सुद्धा भेट घेतील. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणामुळे भारत-अमेरिका संबंध प्रचंड ताणले गेले आहेत, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा होत आहे.
जपान सोबतच्या औद्योगिक भागीदारीचा भारताला सर्वात जास्त फायदा काय?
जपान सोबतच्या औद्योगिक भागिदारीमुळे भारताच SMEs सेक्टर जागतिक पुरवठा साखळीशी जोडलं जात आहे. टोक्यो इलेक्ट्रॉन आणि फुजीफिल्म टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत मिळून सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करत आहे. यात भारतीय SMEs जास्त किंमतीच्या सुट्टया भागांचा पुरवठा करतील. टोयोटा आणि सुजुकी यांच्या सप्लाय चेनमध्ये शेकडो भारतीय टियर-2 आणि टियर-3 SMEs सहभागी होतील. फुजीत्सु आपल्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरमध्ये 9,000 भारतीय इंजीनियर्सची भरती करेल. यात आयटीशी संबंधित SMEs ला चालना मिळेल. या भागीदारीमुळे भारतीय SMEs ना जागतिक स्तराची कार्यप्रणाली, आधुनिक टेक्नोलॉजी आणि नव्या बाजारात पोहोचता येईल. त्यामुळे भारताची निर्यात क्षमता वाढेल.