Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये 'मिसिंग लिंक' जोडणार; शेतकऱ्यांशी संवादासाठी १० सल्लागार
esakal August 30, 2025 12:45 PM

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून महापालिकेकडून रस्ते विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, निधीअभावी संपूर्ण रस्ते विकास अशक्य असल्याने मिसिंग लिंक जोडल्या जाणार आहेत. मिसिंग लिंकचा मोबदला शेतकऱ्यांना टीडीआर स्वरूपात दिला जाणार असून, शेतकऱ्यांशी सुसंवाद व्हावा यासाठी जवळपास दहा सल्लागारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुंभमेळ्यासाठी महापालिकेला अपेक्षित असलेला निधी शासनाकडून मिळण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. जेमतेम दीड वर्ष कुंभमेळ्यासाठी शिल्लक असल्याने महत्त्वाची कामे आत्ताच सुरू करणे आवश्यक आहे. निधीची अपूर्णता असल्याने शासनाने महापालिकेला टीडीआरचा पर्याय दिला आहे. टीडीआरच्या माध्यमातून मिसिंग लिंक रस्त्यांच्या जागा ताब्यात घेण्याचे नियोजन आहे. परंतु टीडीआरचे वाढते भाव व शेतकऱ्यांचा मिळणारा नकार या बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांमध्ये संवाद साधण्यासाठी टीडीआर उपक्रमांतर्गत संवाद मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी दहा सल्लागार नियुक्त केले जाणार आहे.

मिसिंग लिंक बरोबरच रस्ता रुंदीकरणासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार मदत करतील. शेतकऱ्यांशी संवाद साधून टीडीआर स्वरूपात मोबदला देणे व मिसिंग लिंक तसेच रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या सल्लागार किंवा संस्थांना स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुविशारद क्षेत्रातील किमान सात वर्षाचा अनुभव बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच ५० टीडीआर प्रस्ताव हाताळण्याचा अनुभवदेखील बंधनकारक आहे. सल्लागार संस्थेला एका प्रस्तावासाठी ५० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगे OBC मधूनच Maratha आरक्षणावर ठाम का? स्वतंत्र आरक्षणाला विरोध का? टेक्निकल गोष्ट समजून घ्या...

टीडीआर स्वरूपात मोबदला घेऊन त्या बदल्यात महापालिकेला मिसिंग लिंक, तसेच सार्वजनिक उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता सल्लागार नियुक्त केले जाणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्याचा मुख्य उद्देश आहे.

- सचिन जाधव, कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.