मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील कालपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. कोर्टाने परवानगी नाकारल्यानंतरही पोलिसांनी त्यांना काल एक दिवसाच्या आंदोलनाची परवानागी दिली होती, मात्र ती मुदत आणखी के दिवस वाढवून दिल्याने आजही जरांगे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत , आरक्षण मिळेपर्यंत हलणार नाही, मागे हटणार नाही अशीच भूमिका काल जरांगे यांनी घेतली होती. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानव आसपासच्या परिसरात त्यांचा डेरा पडला आहे. दरम्यान हेच आंदोलक मुंबई महानगरपालिकेच्या समोरच्या रस्त्यावर उतरले असून तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. तो रस्ता अडवण्यात आला असून आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत आहे. मात्र यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पोलिसांकडून या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही, आंदोलनाला गालबोट लागणार नाही, अशा प्रकारचं कोणंतही कृत्य करू नका असं कालच्या संबोधनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनीही अशी समज त्यांनी मराठा बांधवांना दिली होती. मात्र याच आंदोलनकर्त्यांची कुठलीही व्यवस्था झालेली नसून त्यांना भरपावसात चिखलात रहावं लागत आहे. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचे साम्राज्य असून तिथे राहण्याची कोणतीही सोय नाही, त्यामुळेच हजारो आंदोलक आता आझाद मैदानाच्या आसपासच्या परिसरात रस्त्यावर आले असून मुंबई महापालिकेच्या समोर असलेल्या रस्त्यावर त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.
तोपर्यंत हटणार नाही
खाण्यापिण्याची, बसण्याची, सांडपाण्याची काहीच व्यवस्था झाली नाही. आझाद मैदानावर सगळीकडे पाणी साचलं आहे, चिखलात बसावं लागतंय, तिथे कमीत कमी खडी तरी टाकावी, आमची बसण्याची व्यवस्था तरी सरकारने नीट करावी अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे. आम्ही दारूडे आहोत असे खोटे आरोपही आमच्यावर करत असल्याची खंत अनेक आंदोलकांनी बोलून दाखवली आहे. सरकारने जेवणाची दुकानं सगळी बंद ठेवली आहेत आणि वाईन शॉप मात्र त्यांनी सुरू ठेवली आहेत. त्यांच्या मनात आहे का की आंदोलकांनी दारू प्यावी , असा संतप्त सवाल अनेकांनी विचारला. या सरकारने आमचे खायचे वांदे करून ठेवले आहेत, असेही काही आंदोलक म्हणाले.
आझाद मैदानावर जोपर्यंत बसण्याची नीट व्यवस्था होत नाही, आमची सोय करून द्या. तोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत तो रास्ता मोकळा करण्यास सुरूवात केली. मात्र मराठा आंदोलक कोणाचंही ऐकण्यास तयार नसून ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत आझाद मैदानात खडी टाकणार नाही, बसण्याची नीट व्यवस्था होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.