29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालं आहे. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत डेरदाखल झाले आहेत. रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. आझाद मैदानात चिखल झाला आहे. रात्री अनेकांच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकली नाही. रात्री झोपण्यास जागेचा आंदोलक शोधाशोध घेत होते. त्यातील अनेकांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. काहींना तर बिस्काटावर रात्र काढावी लागल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. सरकारच नाही तर पाऊस सुद्धा आमची परीक्षा घेत असले तरी आम्ही आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. तर आज सकाळी संतप्त आंदोलकांनी सीएसटीचा मुख्य रस्ता अडवून ठेवल्याचे समोर येत आहे. आंदोलकांची कोणतीही व्यवस्था मुंबई महापालिका, सरकारने केली नसल्याचा संताप यावेळी दिसून आला.
चिखल तरी आंदोलक मैदानावरच
काल संध्याकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. आझाद मैदानावर चिखल झाला आहे. तरी देखील मराठा आंदोलक मैदानात उपस्थित रहाण्यास सुरुवात झाली आहे. जो पर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तो पर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या आझाद मैदान परिसरातील आंदोलकांचा गाडीतच मुक्काम ठोकला.तर अनेकांकडून झोपण्यासाठी जागेचा शोध घेण्यात आला. हातात अंथरुन, पांघरून घेऊन जागेचा शोध घेण्यात येत होता. मुंबईच्या आजाद मैदान परिसरात रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करून आंदोलकांनी मुक्काम केला. पाऊस सुरू असल्याने झोपण्यासाठी जागेचा शोध सुरू होता.
रेनकोट वाटप
आझाद मैदान व मैदानाच्या बाहेर असणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. रात्रभर हे रेनकोट वाटण्यात आले. काल आझाद मैदानात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित असल्यावर त्यांना पावसाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने आज सर्व आंदोलन कर्ते यांना रेनकोट वाटप करण्यात आले. आझाद मैदान परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्याकडून 5 हजार आंदोलकांना जेवण वाटप करण्यात आले. तर
सकाळी 5 हजार वडापावचे वाटप करण्यात आले.
वाशी मार्केटमध्ये मराठा बांधवांचा मुक्काम
वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये मराठा बांधवांचा मुक्काम करण्यात आला. मोबाईलच्या टॉर्चवर जेवण तयार करण्यात आले. अनेक आंदोलकांनी वाहनांमध्ये रात्र काढली. वाशी सिडको सेंटरमध्ये मराठा बांधवांसाठी जेवणं बनवलं जात आहे. दीड हजार मराठा बांधवांसाठी जेवण तयार करण्यात आले. अन्नदान शिधा तयार करण्यात आले.
नवी मुंबई सकल मराठा समाजाकडून मराठा बांधवांसाठी मसाला भात आणि भाजी तयार करण्यात आली. वाशी सेंटरमध्ये त्यांनी मुक्काम केला. महिनाभरच शिधा सोबत आणत मिळेल त्या ठिकाणी जेवण तयार करण्यात आले. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका मराठी बांधवांनी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून खिचडी भात खात आहोत. आज मुंबईमध्ये आल्यावर चपाती भाजी बनवून खाणार असल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.
आता माघार नाही
विजेचा गुलाल उधळल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही. तर पिकअप गाडीमध्ये झोपण्याचं आसन बनवण्यात आला आहे. वाशी सिडको सेंटर हॉलमध्ये मराठा बांधव राहत असून आम्हाला डास किंवा साप चावले तर आम्ही मागे जाणार नाही.अडीच हजार हून अधिक मराठा बांधव वाशी सिडको सेंटर मध्ये दाखल झाले. सरकारने कोणत्याही प्रकारची सोय केली नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारने आरक्षण द्या नाहीतर आम्ही इथून जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.