बोईसर व वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे गाडय़ांची सेवा पूर्णत: ठप्प झाली. गुजरात मार्गावर जाणाऱ्या गाडय़ा पालघर, केळवे, सफाळे आणि विरार येथे थांबवण्यात आल्या. हा प्रकार ऐन गर्दीच्या वेळी आज सायंकाळी घडल्याने प्रकाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
संध्याकाळी सवासात वाजताच्या दरम्यान ओव्हरहेड अचानक तुटली. त्यामुळे गुजरातकडे जाणारी सेवा प्रभावित झाली. अर्ध्या तासाहून अधिक वेळ गाडय़ा थांबवून ठेवण्यात आल्याने प्रवासीवर्गाची गैरसोय झाली. ओव्हरहेड दुरुस्तीचे तांत्रिक पथक घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना बिघाड दुरुस्त करण्यात यश आले. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या तांत्रिक बिघाडाच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱया लोकल वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही अशी रेल्वे च्या सूत्रांनी सांगितले.