Gokul Milk Sangh : गोकुळ दूध संघाच्या कारभाराची होणार चौकशी, अधिकारी नियुक्त; पंधरा दिवसांत द्यावा लागणार अहवाल
esakal September 01, 2025 03:45 AM

Gokul Milk Scam : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कारभाराची चौकशी होणार आहे. यासाठी सांगलीतील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग दोनचे सदाशिव गोसावी यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी पंधरा दिवसांत चौकशी अहवाल विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे सादर करायचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केलेल्या मागणीनुसार ही चौकशी होत आहे.

दूध उत्पादकांना दिलेल्या घड्याळ आणि जाजम यांची विनानिविदा खरेदी प्रक्रिया केल्यासह अन्य कारभाराबाबत ठाकरे सेनेचे उपनेते पवार यांनी शिष्टमंडळासह गोकुळच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापकीय संचालकांना जाब विचारला होता. याचवेळी त्यांनी सहायक निबंधक (दुग्ध, कोल्हापूर) प्रदीप मालगावे यांच्याकडेही चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.

श्री. मालगावे त्यांच्याकडून मागणीचे निवेदन विभागीय उपनिबंधक दुग्ध राजकुमार पाटील (पुणे) यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यांनी याबाबत ‘गोकुळ’कडे स्पष्टीकरण मागविले होते. तेही गोकुळकडून देण्यात आले आहे. यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय उपनिबंधकांनी दोन दिवसांपूर्वी थेट चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्याची माहिती आज सर्वांना पत्राद्वारे मिळाली आहे.

दरम्यान, याबाबत संजय पवार यांनी दुग्ध विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदनकेले आहे. माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांची कोठेही फसवणूक होऊ नये ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या घामाचे पैसे सत्तेचा दुरुपयोग करून बेकायदेशीररीत्या उधळत आहेत. अशा लोकांकडून पैसे वसूल झाले पाहिजेत. संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हा सर्व तपास निपक्ष होऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी भावना व्यक्त केली आहे.

Kolhapur Firing News : कोल्हापुरात किरकोळ वादातून थेट गोळीबार, हातवर करत धाड... धाड... धाड... तीन गोळ्या झाडल्या अन्

शिवसेनेच्या तक्रारींचीच चौकशी

सांगलीतील जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग दोनचे सदाशिव गोसावी हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या तक्रारींचीच केवळ चौकशी करावी, असे राजकुमार पाटील यांच्या आदेशात म्हटले आहे. तसेच चौकशी अधिकारी यांनी पंधरा दिवसांत हा अहवाल द्यायचा आहे. संबंधित अहवाल स्वयंस्पष्ट असावा, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत ही चौकशी पूर्ण करावी लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.