Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजात पावसाचा जोर राहणार, समुद्रात वादळी स्थिती कायम
esakal September 01, 2025 01:45 PM

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दगडमातीचा मोठा भराव रस्त्यावर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. महामार्ग प्राधिकरणने जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत केली. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. समुद्रातदेखील वादळी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. आजही सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी, कणकवली तालुक्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता. घाट परिसरालाही पावसाने झोडपून काढले. त्यामुळे करूळ घाटात दरड कोसळली.

दगडमातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घाटरस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेकडो वाहने घाटरस्त्यात अडकली होती. दरड कोसळल्याची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणची यंत्रणा घाटात पोहोचली. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली. दरड हटविण्याचे काम अर्ध्या तासात पूर्ण करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Weather News Maharashtra : पावसाचा मुक्काम वाढणार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; हवामान विभागाचा अंदाज, समुद्रात वादळी स्थिती

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. देवगड, मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ, कणकवली या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. काही नद्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत आहे.

आजपासून ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाने सिंधुदुर्गला आज ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता, तर उद्यापासून (ता. ३१) ३ सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तालुकानिहाय पाऊस असा (मिलिमीटरमध्ये) ः देवगड ७५, मालवण ६४, सावंतवाडी ५५, वेंगुर्ले ४०, कणकवली ४२, कुडाळ ७३, वैभववाडी ६५, दोडामार्ग ४०.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.