ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरत आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. शुक्रवारपासून आंदोलन करणाऱ्या जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण मनोज जरांगे यांनी आजपासून कडक उपोषणाचा करण्याचा निर्णय घेतला असून आता ते पाणीही पिणार नाहीत. आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिला आहे. ाजपासून ते जलत्याग करणार आहेत.
काल रात्री 12 वाजता जरांगे यांची वैद्यकीय तपासणी पार पडली. वैद्यकीय पथकाने त्यांचे रक्त तपासले तसेच त्यांचा रक्तदाबही (ब्लडप्रेशर) तपासण्यात आला. आजपासून जरांगे पाणी देखील सोडणार आहेत, मात्र उपोषणमुळे जरांगेच्या शरीरातील पाणी आधीच कमी झाले असून त्यांनी पाणी पीत रहावं, पाणी सोडू नये व ors घेत राहावे असा सल्ला डॉक्टर यांनी दिला आहे.
आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची होणार बैठक
दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा राज्य सरकार आज बैठक घेण्याची शक्यता आहे. आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यात काल रात्री उशूरा बैठक होऊन चर्चा झाली. आरक्षण उपसमितीची आज बैठक झाल्यानंतर कोणकोणत्या मागण्या घेऊन जरांगे यांच्याकडे जायचं यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहण महत्वाचं असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागलं आहे.
वाहतुकीचे अपडेट्स काय ?
आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा आंदोलकांसाठी जेवणाची शिदोरी घेऊन काही मराठा बांधव सीएसएमटी स्थानकावरून आझाद मैदानाजवळ आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून अद्याप मुंबईत वाहतूक सुरळीत आहे. आदोलनस्थळाच्या दिशेने अनेक गाड्यांचा ओघ असला तरी सकाळी नेहमीप्रमाणे होणारी वाहतूक कोंडी यावेळी टळली. ईस्टर्न फ्री वे महामार्गावर येण्या-जाण्यासाठी वाहतूक सुरळीत आहे. दरम्यान मराठा आंदोलनाच्या गाड्या मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. मुंबईतील काही भागात वाहतूक कोंडी झाली पण ईस्टर्न फ्री वे पूर्णपणे मोकळा होता. गेल्या तीन दिवसांपासून सकाळी होणारी कोंडी आज दिसली नाही. मुंबईत येणारा व जाणारा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत आहे.
मराठा बांधवानी चर्चगेट रेल्वेस्थानकावर घेतला आश्रय
दरम्यान मराठा आरक्षणासाठी मराठवाड्याच्या नांदेड वरून आलेल्या मराठा बांधवानी चर्चगेट रेल्वेस्थानकावर आश्रय घेतला. रात्रभर हे आंदोलक रेल्वे स्थानकात चटई टाकून स्थानकाच्या पॅसेजमध्ये एका लाईन मध्ये झोपले होते. गावाकडून आलेले जेवण, झोपायला रेल्वे स्थानकाच्या सहारा घेवून राहणारे मराठा आंदोलक मराठा आरक्षणावर ठाम आहेत.
आझाद मैदानावर टाकली खडी
मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी पावसामुळे चिखल असल्याने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहनातून जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळावर खडी कच टाकण्यात आली. पावसामुळे चिखल असल्याने आंदोलकांसाठी उपाययोजनांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर आंदोलनस्थळाजवळ पाच ट्रॅक कचखडी करून उपलब्ध देण्यात आली. स्वयंसेवकांच्या माध्यमातून खडी कच पसरवण्यात आली आहे.