गुलाब हे फूल अनेकांच्या आवडीचे आहे. तसेच विविध खास प्रसंगी गुलाबाची मागणी अधिक असते. बहुतेक लोकांना गुलाबाची लागवड करायला खूप आवडते. कारण योग्य काळजी घेतल्याने गुलाबाचे झाड संपूर्ण वर्षभर जिवंत राहू शकते. पण गुलाबाच रोपं लावणे खूप कठीण असते. विशेषतः जे पहिल्यांदाच गुलाबाची लागवड करत आहेत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. गुलाबाची लागवड करण्याची योग्य वेळ कोणती आणि त्याची काळजी कशी घ्यावी ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
– गुलाबाची लागवड करण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलायचे झाले तर फेब्रुवारी ते मार्च आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर हे सर्वोत्तम वेळ आहेत. या हंगामात सूर्यप्रकाश आणि वातावरणातील उष्णता कमी असते, ज्यामुळे गुलाबाच्या रोपांच्या लागवडीसाठी हे चांगले वातावरण असते.
– गुलाबाचे रोप वाढवण्यासाठी रोपवाटिकेतून मुळांसह पण मातीशिवाय रोप आणावे. त्यानंतर मुळे रात्रभर पाण्यात ठेवा. नंतर रोप लावण्यासाठी एक भांडे घ्या आणि त्याच्या तळाशी एक छोटे छिद्र करा जेणेकरून पाणी साचणार नाही. त्यात कंपोस्ट माती मिक्स करा आणि आता या मातीमध्ये मध्यभागी एक छिद्र करा, आणि त्यात मुळासकट गुलाबांचे रोप मातीत ठेवा. आता थोडी माती वरून टाका आणि पाणी घाला.
गुलाबाचे रोपं योग्य दिशेने ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. गुलाबाच्या रोपाला दररोज 6 ते 8 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तथापि उन्हाळ्यात दुपारच्या उन्हापासून त्याचे संरक्षण करा. त्याचवेळी हिवाळ्यात ते खूप थंड ठिकाणी ठेवणे टाळा.
गुलाबाचे रोप लावल्यानंतर, त्याची माती ओली राहील याची खात्री करा. माती सुकल्यावर त्याला पाणी द्यावे. फक्त रोपाच्या मुळांना पाणी द्या. पानांवर पाणी शिंपडल्याने त्याची पाने कुजण्याची शक्यता अधिक असते.
जर तुमच्या गुलाबाच्या झाडाला जास्त फुले येत नसतील किंवा झाड कायम बहरलेलं असावे असे वाटते तर नियमितपणे गुलाबाची वाळलेली पाने आणि फुले काढून टाकत राहा. तसेच गुलाबाच्या पानांची आणि वाढलेल्या फाद्यांची योग्य वेळी कटींग करा, पण कटींग करताना योग्य काळजी घ्या. यामुळे नवीन फुले येतील आणि झाड हिरवेगारही राहील. झाडाला नियमितपणे सेंद्रिय खत देत राहा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)