पिंपरी, ता. ३१ : सार्वजनिक सुट्ट्या असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येत्या आठवड्यात केवळ तीन दिवसच सुरू राहणार आहे. त्यामुळे शिकाऊ परवाना व पक्का परवाना चाचणीसह वाहनांसदर्भातील विविध कामे खोळंबण्याची शक्यता आहे.
नवीन वाहन परवाना काढणे, कर्जाचा बोजा चढविणे-उतरवणे, परवान्याचे नूतनीकरण, डुप्लिकेट परवाने, रिक्षाचे परमीट तसेच वाहन ट्रान्सफरसह विविध कामे ऑनलाइन झाली आहेत. मात्र, वाहनांची नोंदणी, पक्का परवाना चाचणी, शिकाऊ परवाना तसेच विविध कागदपत्रे जमा करण्यासाठी नागरिक आरटीओ कार्यालयात येत असतात. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी गौरी पूजनानिमित्त पुणे जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. तर, शुक्रवारी ईद-ए-मिलादनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. शनिवारी आणि रविवारी आरटीओ कार्यालय बंद असते. त्यामुळे या आठवड्यात मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवशीच आरटीओ कार्यालय सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना आरटीओसंदर्भातील कामे तीन दिवसांत करून घ्यावी लागणार आहेत. तसेच परवाना अर्जासोबत चाचणी परीक्षेसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट नव्याने ठरवून घ्यावी लागणार आहे.