दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स यांचे चाहते जितके दक्षिण अफ्रिकेत नसतील त्याच्या दुप्पट तिप्पट भारतात आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. एबी डिव्हिलियर्सचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. एबी डिव्हिलियर्स हा दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत बसतो. त्याने 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंविरुद्ध खेळला आहे. आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळताना डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांची वेगळीच गट्टी जमली होती. दोघांनी आरसीबीला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. एबी निवृत्त झाल्यानंतर आरसीबीच्या जेतेपदासाठी प्रयत्न करत राहिला. आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं तेव्हा एबी डिव्हिलियर्सने आनंदही व्यक्त केला होता. आता एबी डिव्हिलियर्सने पाच दिग्गज क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. त्यांच्यासोबत आणि त्यांच्याविरुद्ध त्याने क्रिकेट खेळला आहे. पण या पाच दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीचं नाव नाही.
एबी डिव्हिलियर्सला त्याच्या दृष्टीने पाच दिग्गज क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने जॅक कॅलिस (दक्षिण अफ्रिका), अँड्र्यूज फ्लिंटॉप (इंग्लंड), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), सचिन तेंडुलकर (भारत) आणि मोहम्मद आसिफ (पाकिस्तान) या पाच खेळाडूंची नावं घेतली. एबी डिव्हिलियर्सने या यादीतून विराट कोहलीला वगळलं. पण याबाबत त्याने त्याची माफी देखील मागितली. एबीने बियर्ड बिफोर विकेट पॉडकास्ट बोलताना सांगितलं की,’जेव्हा सचिन तेंडुलकर फलंदाजीला उतरायचा तेव्हा त्याचं जोरदार स्वागत व्हायचं. सर्व काही थांबायचं. त्याला फलंदाजी करताना पाहून चांगलं वाटलं. विराट, माफ कर. यासाठी अशा प्रश्नांची उत्तरं देणं कठीण असतं. ‘
एबी डिव्हिलियर्सने पुढे सांगितलं की, ‘जॅक कॅलिस हा जगातील सर्वात मोठा अष्टपैलूही नाही तर सर्वात मोठा क्रिकेटपटू होता. आसिफ सर्वोत्तम सीम गोलंदाज होता. त्याचा सामना मी केला आहे. वॉर्नविरुद्ध खेळण्याची एक वेगळीच मजा होती. त्याचं व्यक्तिमत्व जबरदस्त होतं. फ्लॉफी हॅट, झिंक क्रीम सोनेरी केसं.. फ्लिंटॉफ मोठ्या सामन्याचा खेळाडू होता.’ एबी डिव्हिलियर्सच्या फलंदाजीचा आनंद लुटण्याची संधी मागच्या महिन्यात क्रीडारसिकांना मिळाली. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात त्याने 60 चेंडूत नाबाद 120 धावा ठोकल्या होत्या. तर या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटने गौरविण्यात आलं.