गणेश उत्सवानिमित्त अडीच हजार आदिवासींचा विमा
esakal September 02, 2025 01:45 AM

गणेशोत्सवानिमित्त अडीच हजार आदिवासींचा विमा
ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) ः गणेशोत्सवानिमित्त ठाणे सिटीझन्स फाउंडेशनने यावर्षी २५०० आदिवासी नागरिकांचा विमा काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ४०० जणांचा विमा काढून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. विम्यासोबतच जिल्ह्यातील दुर्मिळ, डोंगराळ भागात राहणाऱ्यांना आदिवासींना रुग्णवाहिनी देण्याचा फाउंडेशनचा मानस आहे.
ठाणे जिल्हा आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. येऊर, बदलापूर, शहापूर, मुरबाड आदी भागातील अनेक आदिवासी गाव, पाडे विकासाच्या प्रवाहापासून दूर आहेत. त्यांच्यापर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचत नाहीत. औषधोपचारापासून त्यांना वंचित राहावे लागते. अनेक पाड्यांतील गंभीर रुग्णासाठी रुग्णवाहिनी सेवा नसल्याने त्यांना शहरातील रुग्णालयांची मदत घेता येत नाही. अनेकांना सर्पदंश, बिबट्याचा हल्ला, दरड कोसळणे, झाड पडून मृत्यू होणे, डेंगी-मलेरिया अथवा इतर घातक संसर्ग, साथीच्या आजाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांनासुद्धा योग्य उपचार मिळावेत, नैसर्गिक अथवा अपघातसारख्या घटनेत मृत्यू, जमखी झालेल्यांना आर्थिक आणि औषधांची मदत मिळावी यासाठी ठाणे सिटीझन्स फाउंडेशन पुढे आली आहे.

६०० अर्जाचे वाट
पहिल्याच टप्प्यात २५०० आदिवासींना मोफत विमा काढून देण्यात येत आहे. गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातील ५०० आदिवासींना विमा अर्जाचे वाटप केले असून, त्यातील १०० जणांना विमा काढला असून, अर्ज जमा होताच इतरांचाही काढला जाणार आहे, तर बदलापुरात चोनेगाव येथे ६०० अर्जाचे वाटप केले असून, त्यातील अर्ज जमा झालेल्या ३०० जणांना विमा पत्र देण्यात आले असल्याचे फाउंडेशनने संस्थापक कॅसबर ऑगस्टीन यांनी सांगितले. या वेळी १०० औषधी रोपांची लागवड करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.