दिवंगताच्या नावाने राजकारण
दिवंगत नगरसेवक करतोय सत्ताधाऱ्यांना लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : दिवंगत नगरसेवकाच्या नावाने एक फेसबुक खाते सुरू असून, त्या माध्यमातून थेट सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. याप्रकरणी काही जणांच्या तक्रारीवरून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी गेलेल्या शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैया यांना धक्काबुक्की करण्यात आली. श्रीनगर पोलिस ठाणे हे शिवसेनेची शाखा झाली असल्याची टीका अमित सरैया यांनी केला.
मागील काही दिवसांपासून दिवंगत भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुकवर एक खाते चालविले जात आहे. या खात्यावरून शिवसेनेशी संबंधित असलेल्या माजी नगरसेवकांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या पोस्ट टाकण्यात येत आहेत. याप्रकरणी शिवसैनिकांच्या तक्रारीवरून ठाकरे गटाच्या चंद्रेश यादव याला श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यासंदर्भात अमित सरैया यांनी पत्रकार परिषद घेऊन, चंद्रेश यादव हा गोरगरीब घरातील मुलगा असून, त्याला पोलिसांनी नाहक ताब्यात घेतले आहे. चंद्रेश यादव हे बनवाट खाते चालवत असता तर त्याला ताब्यात घेतल्यानंतर टायगर अभी जिंदा है अशी पोस्ट आलीच कशी? चंद्रेशच्या आई-वडिलांनी आपणाला फोन केल्याने पोलिस ठाण्यात जाऊन बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु, ब्रिटिशांप्रमाणे वागणाऱ्या पोलिसांनी आपले म्हणणे ऐकून घेतले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या तरुणाला पोलिसांनी तत्काळ सोडावे अन्यथा या दडपशाहीविरोधात जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही सरैया यांनी दिला आहे.
दरम्यान, विलास कांबळे यांचे बंधू सुरेश कांबळे हेही श्रीनगर पोलिस ठाण्यात गेले असता आवारातच त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप कांबळे यांनी केला.