येवला: जिल्हा परिषदेच्या गटांच्या संख्येत तालुक्यात बदल झाला नसून पंचायत समितीचे गणही ‘जैसे थे’ आहेत, पण नावात मात्र बदल झाला आहे. आता सायगाव गण गवंडगाव झाला, नागडे गण उंदीरवाडी, तर चिचोंडी गण निमगाव मढ नावाने ओळखला जाणार आहे. त्यातच आरक्षणाची पद्धत बदलल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढली असून, आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. नव्या पिढीत दुसऱ्या फळीत अनेक तरुण व उमदे नेतृत्व तयार झाल्याने या वेळी गटासह गणातही उमेदवारीसाठी स्पर्धा लागणार असे चित्र आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सध्या सुमारे ४८ हजार लोकसंख्येमागे एक सदस्य आहे. प्रस्तावित नव्या रचनेमध्ये आता ४१ हजार ६६४ लोकसंख्येसाठी एक प्रतिनिधी नेमला गेला. लोकसंख्येच्या अनुषंगाने येथेही एक गट वाढणार, असे गृहीत धरले होते. मात्र सध्या तालुक्यात पाच गट राहिले आहेत. अनेक वर्षे येथे चारच गट होते. मात्र २०११ च्या निवडणुकीत झालेल्या पुनर्रचनेत राजापूर हा नवा गट अस्तित्वात येऊन पाच गट व दहा गण झाले आहेत. आताच्या रचनेत येथे बदल न झाल्याने आता पुन्हा गट वाढण्यासाठी आठ-दहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे हे नक्की..!
नावात झाले बदल
नावात काय आहे असे म्हटले जाते, पण गणाच्या नावावरही राजकीय गणिते फिरत असल्याचे तालुक्याने पाहिले आहे. यापूर्वीच्या गणांच्या रचनेत बदल झाला नसला तरी लोकसंख्येच्या निकषानुसार गणांची नावे मात्र बदलली आहेत. इतके दिवस राजापूर गटात राजापूर व सायगाव गणाचा समावेश होता. मात्र नियमानुसार सर्वाधिक लोकसंख्येचे गाव हे गणाचे गाव असते. त्यामुळे येथे आता बदल झाला असून, सायगावची जागा गवंडगावने घेतली आहे.
असाच बदल नागडे गणाचा झाला असून, अंदरसूल गटातील नागडे गावापेक्षा उंदीरवाडीची लोकसंख्या अधिक असल्याने आता उंदीरवाडी गण झाला आहे. मुखेड गटातील चिचोंडी गणाची जागा निमगाव मढने घेतली आहे. मात्र या बदलात गणाच्या रचनेत व गावांच्या संख्येत कुठलाही बदल झालेला नाही.
गटाची रचना बदलणे गरजेचे
येवल्याच्या अलीकडे पश्चिम-उत्तर, दुसऱ्या बाजूला पूर्व भाग अशा दोन भागांत भौगोलिकदृष्ट्या तालुका विभागला आहे. पण २०११ मध्ये गट-गणाची रचना करताना मोठी गुंतागुंत झालेली आहे. शहराच्या पूर्वेकडील गावे पश्चिमेच्या गटाला जोडलेली असल्याने मध्ये शहर आले आहे.
त्यामुळे गटातील गावांची पुनर्रचना होणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगतात. राजापूर गटाला थेट वैजापूरच्या सीमेलगतची गावे जोडली असून, हा गट सर्वांत मोठा व भौगोलिकदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीचा असल्याने या गटातील काही गावे कमी होऊन ती अंदरसूल व नगरसूल गटाला जोडण्याची, तर अंदरसूललाही शहराच्या पश्चिमेची गावे असल्याने ती पाटोदा गटाला जोडली जाण्याचीही मागणी होत आहे. सध्या नगरसूल, पाटोदा, मुखेड, अंदरसूल व राजापूर हे गट अस्तित्वात आहेत.
Deputy CM Eknath Shinde: मराठा आरक्षणाबाबत नियमातून मार्ग निघेल: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शरद पवारांनी आतापर्यंत काय केले?आता लक्ष आरक्षणाकडे
कोण उमेदवार ठरणार हे सर्वस्वी आरक्षणावर अवलंबून असते. त्यातच मुखेड, राजापूर, नगरसूल गट आरक्षित होणार, अशी जोरदार चर्चा आहे. मधूनच राजापूर गटाचे नाव पुढे येते. त्यामुळे कोणाची सोय आणि कोणाची गैरसोय होणार हे पूर्णतः आरक्षणावर अवलंबून असल्याने आता सर्वांच्याच नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. या वेळी दराडे, पवार, बनकर, शिंदे या चारही नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवार रिंगणात दिसू शकतील. शासनाने आरक्षणाची चक्राकार पद्धत बंद करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण काढण्याचा निर्णय घेतल्याने गुंता वाढणार आहे. त्यामुळे नेतेगण आताच चिंतित असल्याचे दिसते.