Mumbai High Court : कोर्टाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला फटकारलं, दिला मोठा आदेश
Tv9 Marathi September 02, 2025 11:45 AM

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे. आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो. न्यायमुर्ती रवींद्र घुगेंच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत असे थेट आदेश कोर्टाने दिले आहेत. 5 हजारपेक्षा जास्त लोक येऊ नये ही आयोजक आंदोलकांची जबाबदारी होती असं कोर्टाने म्हटलं. तसेच आमरण उपोषणाला परवानगी नव्हती, पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असंही कोर्टाने म्हटलय

सध्या आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलक वावरताना दिसतायत. CSMT परिसर मराठा आंदोलकांनी व्यापून टाकलेला दिसतो. मराठा आंदोलकांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात मराठा आंदोलक रेल्वे स्टेशन, परिसरात कबड्डी, खो-खो खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. रस्त्यावर मराठा आदोलकांनी आंघोळ केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आंदोलनामुळे यंत्रणा ठप्प – सदावर्ते

हायकोर्टात मराठा आंदोलनाबाबत युक्तिबाबत करताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, या आंदोलनामुळे सीएसएमटी आणि परिसरात चार मोठी रुग्णालय आहेत. तिथलं जनजीवन आणि आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. सीएसएमटी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे तिथे आंदोलन केल जात आहे. कोर्टाच्या आजूबाजूलही आंदोलक आहेत. रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी डब्यात वाट्टेल तसे आंदोलक फिरत आहेत. आंदोलक गाड्यांचे लायसन्स आहे का? असे वाहनधारकांकडे विचारात आहेत, रेल्वे ट्रॅकवर उतरत आहेत, सगळ्या रस्त्यांवर गाड्या अडवत आहेत असं म्हणत सदावर्तेंनी सीएसटीमधल्या तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो न्यायाधीशांना दाखवले.

शरद पवार-उद्धव ठाकरेंची आंदोलनाला मदत

आपल्या युक्तिवादात पुढे सदावर्ते यांनी यात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. सदावर्ते म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोक यांना अन्नधान्य ट्रकच्या माध्यमातून पुरवत आहेत. अंतरावालीत सराटीत पोलिसांना मारहाण झाली, महिला पोलिसांनाही मारहाण झाली. काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, पाण्याच्या बॉटल फेकल्या. महिला पत्रकारांची छेड काढली जात आहे असंही सदावर्ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.